वसई: विरार रमाबाई अपार्टमेंट ही धोकादायक इमारती कोसळून १७ जणांचा बळी गेल्यानंतर शहरातील अन्य धोकादायत इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात अनेक वर्षे जुन्या झालेल्या इमारती व बांधकामे आहेत. यातील बहुतांश इमारती अनधिकृत असून काही इमारतींचे बांधकाम हे फारच जीर्ण झाल्याने त्या धोकादायक अवस्थेत आहेत. पावसाळा सुरू होताच शहरात जीर्ण झालेल्या इमारतींचा स्लॅब, भिंत व इमारत कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे या सर्व इमारतींवर दुर्घटनेची टांगती तलवार कायम आहे.

विरार पूर्वेच्या विजयनगर येथे चार मजली रमाबाई अपार्टमेंट अनधिकृत इमारत आहे. यात ५० सदनिका होत्या. त्यापैकी १२ सदनिका असलेला काही भाग मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास कोसळला यात ढिगाऱ्याखाली अडकून १७ जणांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहे. या घटनेनंतर संपुर्ण इमारत खाली करण्यात आली. त्यामुळे अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने जीर्ण झालेल्या व धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरात अनेक धोकादायक इमारती असून त्यात लोकं रहात आहेत. यातील बहुतांश इमारती अनधिकृत असून त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे.  महापालिकेने वेळीच जर अशा जीर्ण झालेल्या इमारतींकडे लक्ष दिले असते तर अशा घटना टाळता येतील अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी दिली आहे.

यंदाच्या वर्षी पालिकेने शहरात ६१ अतिधोकादायक इमारत असल्याची घोषणा केली होती. मात्र अजूनही बहुतांश इमारती खाली झाल्या नसून धोकादायक स्थिती असलेल्या इमारतींत नागरिक राहतात. त्यामुळे या धोकादायक इमारतींची टांगती तलावार कायम असल्याचे सध्याचे चित्र दिसून येत आहे.

नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर

इमारतीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या रहिवाश्यांच्या नातेवाईकांना समजताच मुंबईसह इतर भागात राहणाऱ्या नातेवाईकांनी विरारकडे धाव घेतली. विजयनगर परिसरात गर्दी केली होती. कुणाची आत्या तर कुणाचे दीर आणि सासू ढिगाऱ्याखाली गाडले होते. बचावकार्य सुरु होते मात्र काहींचा दुपारपर्यंत शोध लागला नव्हता. त्यामुळे नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. कोसळलेल्या ढिगाऱ्याकडे पाहत नातेवाईक आक्रोश करीत होते यामुळे परिसरात गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुःखाचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसून आले.

पालिकेकडून नोटीस तरीही भाडेकरू इमारतीत

रमाबाई अपार्टमेंटला पालिकेकडून मे महिन्यात इमारतीला धोकादायक असल्याची नोटीस बजावण्यात आली होती असे पालिकेकडून सांगण्यात आले. मात्र इमारत धोकादायक ठरवल्यानंतरही ही अनधिकृत इमारत खाली करण्यात आली नव्हती अशी माहिती समोर येत आहे. इमारत मालकाने हे माहित असूनही भाडेकरू इमारतीत ठेवले असा आरोप या इमारतीतील रहीवाश्यांकडून करण्यात आला आहे.

चालू वर्षातील दुर्घटना

२६ ऑगस्ट २०२५ विरार विजयनगर येथे रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा भाग कोसळला. यात १७ जणांचा मृत्यू व ९ जण जखमी

५ जुलै २०२५ नालासोपारा अलकापुरी येथील साईराज अपार्टमेंट इमारत कोसळली. तातडीने इमारत खाली केल्याने दुर्घटना टळली.

१९ जून २०२५ नालासोपारा पूर्वेत मुसळधार पावसामुळे बावशेत पाडा येथील श्रीकृष्ण चाळीची भिंत कोसळली

३० मे २०२५ विरार- एमबी इस्टेट येथील मर्चेन इमारतीमधील ११ क्रमांकाच्या खोलीचा स्लॅब कोसळून अलफिया अब्बास मनासवाला या महिलेचा मृत्यू

२६ मे २०२५ विरार- गोपचर पाडा येथील पूजा अपार्टमेंट ३३५ क्रमांक सदनिकेचा स्लॅब कोसळला होता. यात लक्ष्मी सिंग (२७) महिलेचा मृत्यू.

२१ मे २०२५नालासोपारा- आचोळे येथील सिमरन साई या ४ मजली इमारतीच्या ४०४ क्रमांक खोलीचा स्लॅब कोसळळा. या खोलीत अडलेल्या एका महिलेसह १४ वर्षीय मुलाची अग्निशमन दलाने सुटका केली होती.

इमारत कोसळल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा शहरात घडू नये यासाठी धोकादायक इमारतींच्या संदर्भात कडक कारवाई करून त्या खाली केल्या जातील. त्या बाबत कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही.:- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त  वसई विरार महापालिका