विरार कोपरी येथे तबेल्यातील पेंढय़ाला भीषण आग

वसई : विरार पूर्वेतील कोपरी येथे तबेल्यात गुरांसाठी साठवून ठेवण्यात आलेल्या पेंढय़ाला भीषण आग लागल्याची घटना घडली. सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. स्थानिक ग्रामस्थांनी व अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवून गुरांना सुरक्षित स्थळी हलविल्याने त्यांचा जीव वाचला.

गुरांना चारा म्हणून लागणारा पेंढा, हा वर्षभराचा साठा ठेवण्यात आला होता. शॉर्टसर्किट झाल्याने या पेंढय़ावर आगीची ठिणगी पडून आग लागली. गुरे तबेल्यात बांधलेली असल्याने खळबळ उडाली होती. तातडीने या ठिकाणी बांधलेल्या २० म्हशी व ५ गायी यांची दोरी तोडून त्यांना सुरक्षित स्थळी हलविल्याने मोठी दुर्घटना टळली. याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.  तसेच सुरुवातीला अग्निशमन दलाची गाडी दाखल होईपर्यंत कोपरी ग्रामस्थांनी एका दुकानातून पाइप घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला होता. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून गुरांना लागणारा चारा व तबेला जळून खाक झाला आहे.