वसई- वसई विरार शहरला सुर्या प्रकल्पातील अतिरिक्त पाणी तात्काळ देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे सोमवार पासून आगरी सेनेच्या तीन महिलांनी सुरू केलेले आमरण उपोषण शनिवारी मागे घेण्यात आले आहे. खासदार राजेंद्र गावित यांनी उपोषणस्थळी महिलांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

वसई विरार शहराला सुर्या प्रकल्पातून अतिरिक्त १६५ दशलक्ष लिटर्स पाणी देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असले तरी उद्घटनाअभावी पाणी देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे आगरी सेनेच्या महिला कार्यकर्त्या रुपाली पवार, त्रिवेणी माने आणि अश्विनी खेवरा या सोमावर पासून पालिका मुख्यालयाबाहेर आमरण उपोषणासाठी बसल्या होत्या. शनिवारी खासदार राजेंद्र गावित, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांनी या उपोषणस्थळी जाऊन महिलांची भेट घेतली. पाणी मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याबद्दल महिला ठाम होत्या. यावेळी खासदार गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दुरध्वनीद्वारे संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती दिली. त्याची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्घटनाची वाट न बघता तात्काळ पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू कऱण्याचे निर्देश दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाणी वितरणाचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी खासदारांना दिले आहेत. अजूनही काही तांत्रिक बाबींची अडचण असल्यामुळे पहिले तीन ते चार दिवस गढूळ पाणी येणार असून त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पाण्याची जलदाब चाचणी (वॉश आऊट) सुरू करण्यात आली आहे. वाढीव पाण्याबाबत हा आगरी सेनेचा विजय नसून वसईच्या २५ लाख लोकांचा विजय आहे. सुर्या धरणाचे वाढीव पाणी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात योग्य प्रमाणात वितरित करण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करावी अशी मागणी आगरी सेनेचे अध्यक्ष कैलास पाटील यांनी केली आहे.