लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : वसई पूर्वेच्या मधूबन गोखीवरे भागात रस्त्याची उंची वाढविण्याचे काम सुरू केले आहे. मात्र या कामाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात धूळ उडून प्रदूषण निर्माण होऊ लागले आहे. त्याचे नियंत्रण केले जात नसल्याने त्याचा फटका येथून ये जा करणाऱ्या प्रवाशांना बसू लागला आहे.

मागील काही वर्षांपासून वसई विरार शहरात पावसाळ्यात पूरस्थितची समस्या निर्माण होत आहे. याचा फटका वसईच्या जनतेला बसत आहे. विशेषतः मुख्य रस्ते पाण्याखाली जाऊन वाहतूक व्यवस्था कोलमडून पडते. यात मधूबन गोखीवरे हा मुख्य रस्ता ही पाण्याखाली जाऊन जनजीवन विस्कळीत होत असते. यासाठी या रस्त्याची उंची वाढविण्याचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. त्या रस्त्यावर मातीभराव, त्यावर खडीकरण, कॉंक्रिट पावडर टाकून ठेवली आहे. ते कामही अगदी धीम्या गतीने सुरू असून या कामा दरम्यान आता मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य तयार होऊ लागले आहे.

मुख्य रस्ता असल्याने वाहनांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे संपूर्ण रस्ता धुळीचा बनला आहे. जेव्हा मोठी वाहने येथून ये जा करतात तेव्हा सर्वाधिक धूळ रस्त्यावर उडते. याचा फटका ही येथुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसू लागला आहे. या रस्ता धुळीमुळे एक प्रकारे सर्व प्रवाशांची कोंडी होऊ लागली आहे. विशेषतः दुचाकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा अधिकच त्रास होऊ लागला आहे. कामावर तयार होऊन निघणाऱ्या नागरिकांच्या कपड्यांची ही अक्षरशः वाट लागत आहे.

रस्त्यावर जाताना इतकी धूळ उडते तरीही पालिका ते नियंत्रणासाठी उपाययोजना आखत नाही असे अपंग जनशक्ती संघटनेचे देविदास केंगार यांनी सांगितले आहे. अशा धूळ प्रदूषणाने नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते यासाठी पालिकेने यावर उपाययोजना करावी अशी मागणी केंगार यांनी केली आहे. पालिकेकडून संबंधित ठेकेदाराला सांगून प्रदूषण नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असे प्रभाग समिती जी चे सहायक आयुक्त निलेश म्हात्रे यांनी सांगितले आहे.

पालिकेच्या दुर्लक्षितपणाचा फटका

रस्त्यावर धूळ उडून प्रदूषण होऊ नये यासाठी पालिकेकडुन सखोल स्वच्छता मोहीम घेतली जाते.परंतु पालिकेचे ज्या भागात प्रकल्प व कामे सुरू आहेत अशा ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे असताना पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसून श्वसन यासह अन्य आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.यासाठी धूळ नियंत्रणासाठी पालिकेने उपाययोजना आखाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धूळ नियंत्रणासाठी टॅंकरद्वारे पाण्याचा मारा करा

रस्त्याच्या उंची साठी माती व काँक्रिटची पावडर टाकल्याने त्यावरून वाहने जेव्हा प्रवास करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात धुळ उडते. या धूळ नियंत्रणासाठी त्यावर आता टॅंकर द्वारे पाणी हलके पाणी मारून धूळ नियंत्रण करावे प्रदूषण होऊ यासाठी संबंधित ठेकेदाराला ही सूचना कराव्यात अशी मागणी आता नागरिक करीत आहेत.