वसई: वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या वसईतील शासकीय निवासस्थानी मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापेमारी केली. या छापेमारीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली तर दुसरीकडे आयुक्तांवर झालेल्या कारवाईमुळे वसई पूर्वेच्या भागात नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी व मिठाई वाटत आनंद साजरा केला.
सोमवारी तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार यांचा पालिका मुख्यालयात मोठ्या थाटामाटात निरोप समारंभ पार पडला. मात्र निरोप समारंभाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्यांच्यावर ईडीने छापेमारी केली. या कारवाईचे पडसाद शहरातही उमटले आहेत. पालिका आयुक्तांनी प्रशासकीय कार्यकाळात मनमानी कारभार करीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या त्यांच्या सुरू असलेल्या मनमानी कारभाराबाबत मार्च महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही आम्ही तक्रार केली आहे. त्यांना भेट स्वरूपात ज्या मालमत्ता आहेत त्यांची कायदेशीर चौकशी व्हावी अशी मागणी केली होती, असे भूमिपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी सांगितले आहे.
पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या तीन वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळात शहरात मनमानी कारभार सुरू होता. रस्ते, बांधकाम, पाणी पुरवठा, चुकीच्या पद्धतीने ठेके देणे अशा विविध मार्गाने भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा आरोप ही पाटील यांनी केला आहे. या मनमानी कारभार करणाऱ्या आयुक्तांवर ईडीने छापेमारी करून कारवाई केली आहे. कुठेतरी अशा भ्रष्टाचाराला आळा घालणे गरजेचे होते. त्यामुळे आज ग्रामस्थ आम्ही फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद साजरा करीत आहोत असे सुशांत पाटील यांनी सांगितले आहे.