२० तासांच्या अथक प्रयत्नानंतर मोहीम यशस्वी
वसई: वसईतील हर्षांली वर्तक आणि नितीन गांधी या दोन गिर्यारोहकांनी हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅलीतील सर्वात कठीण असलेले ६ हजार १८ मीटर उंचीवरील चंद्रभागा १४ शिखर सर करण्यात यश मिळवले आहे. या मोहिमेत देशभरातील विविध भागातून आलेल्या बारा गिर्यारोहकांचा सहभाग होता. २० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.
हिमाचल प्रदेशातील स्प्रिती व्हॅलीतील चंद्रभागा १४ ही मोहीम अवघड असून गेल्या तीन वर्षांत चंद्रभागा १४ च्या वाटेला कोणताही गिर्यारोहक त्याची बिकट वाट, अवघड चढण यामुळे फिरकला नव्हता. मात्र इंडियन माऊंटनिंग फाऊंडेशनच्या वतीने तसेच अॅडव्हेंचर व्हॅलीच्या माध्यमातून ही मोहीम आखण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातील पाच, गुजरातमधील पाच, इंदोरमधील एक व हरियाणातील एक अशा एकूण बारा गिर्यारोहकांचा समावेश होता.
पहिला प्रयत्न अयशस्वी
१५ जुलै रोजी हे सर्व गिर्यारोहक सोलंग अॅडव्हेंचर व्हॅली येथे पोहोचले होते. बाताल, बेस कॅम्प, कॅम्प -१ असा त्यांनी प्रवास केला. प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर कॅम्प १ ते समिटपर्यंत चार हजार फुटावर प्रवास करूनही खराब वातावरणामुळे अवघ्या तीनशे मीटर अंतरावर पोहोचूनही त्यांना आपली मोहीम अर्धवट सोडावी लागली होती. तब्बल १७ तासांची मेहनत वाया गेली. वसईतील कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक हे हवामानाशी मिळते जुळते होऊ शकले नाही. त्यांना तंबूतच राहावे लागले
नव्याने प्रयत्न
पुन्हा नव्या जोमाने गटप्रमुख हर्षांली वर्तक यांच्या गटामधील चार तर दुसऱ्या गटात सहा जणांनी रात्री दहाच्या दरम्यान चंद्रभागा १४ मोहीम सर करायला सुरुवात केली. बोचरी थंडी, गुडघाभर बर्फ, बर्फवृष्टी या आव्हानांना सामोरे जात बारा तासांची पायपीट करत ते सकाळी दहा वाजता चंद्रभागाच्या शिखरावर पोहोचले. तेथे पोहोचताच अभिमानाने भारताचा तिरंगा फडकवला. हर्षांली वर्तक हिच्या गटात विरारचा नितीन गांधी,औरंगाबादचा प्रविण शेलके, इंदूरची अॅनी होता. वसईच्या कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक यांना ही मोहीम अर्धवट सोडावी लागली.
‘कांचनगंगा सर करण्याचे स्वप्न’
हर्षांली वर्तकने देश-विदेशातील अनेक अवघड ट्रेकिंग मोहिमा सर केलेल्या आहेत. माऊंट फ्रेंडशिप पिक, हनुमान टिब्बा, माऊंट युनाम, मांऊट मेनथोसा, मांऊट डीकेडी म्हणजे द्रोपदीचा दांडा, माऊंट फ्युजी, माऊंट किल्लीमांजरो, माऊंट इल्बूस या देश-विदेशातील अनेक अवघड मोहिमा तिने सर केल्या असून कंचनगंगा ही हिमालयातील अवघड मोहीम तिला सर करायची असून तिचे ते स्वप्न आहे.