इंधनाची बचत आणि पर्यावरणाचे संवर्धन

वसई:  वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेत पर्यावरणपूरक १० सीएनजी बसेस दाखल झाल्या आहेत. यामुळे इंधनाची बचत होऊन पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे. प्रदूषणावर नियंत्रण आणण्याच्या उपाययोजनांसाठी वसई विरार महापालिकेने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रम (नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम) या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर  केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून राज्यातून केवळ वायुप्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी निधी मंजूर केला होता. त्याद्वारे प्रदूषण कमी करण्याच्या एक भाग म्हणून १५ सीएनजी बसेस आणि ३ विद्युत बसेस आणल्या जाणार आहेत. त्यापैकी १० सीएनजी बसेस वसई विरारच्या परिवहन सेवेत दाखल झाल्या आहेत.

सीएनजी बसेसमध्ये इंधन भरण्यासाठी ३ ठिकाणी सीएनजी पंप उभारले जाणार आहेत. या बसची क्षमता ४२ प्रवाशांची असून ती दररोज अडीचशे किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. वसई विरारच्या विविध शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना या बसचा लाभ मिळणार आहे. इंधनामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणाची समस्या दूर करण्यासाठी सीएनजीवर चालणाऱ्या बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशी माहिती परिवहन सभापती प्रीतेश पाटील यांनी दिली. या सीएनजी बसचा शुभारंभ नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी महौपार नारायण मानकर, प्रवीण शेट्टी, रुपेश जाधव तसेच परिवहन सदस्य उपस्थित होते.

बसचे मार्ग वाढणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसई विरार महापालिकेची परिवहन सेवा ‘एसएनएन’ (साई, नैष्णई आणि नीता) या ठेकेदांरामार्फत सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने बसचे मार्ग वाढविण्यात येत आहेत. सध्या परिवहनच्या ताफ्यात ८४ बसेस असून त्या २२ मार्गावर धावत आहेत. टप्प्याटप्प्याने बसचे मार्ग वाढविले जाणार आहेत. सीएनजी बसबरोबरच ३ विद्युत बसेस (इलेक्ट्रिक) ही पालिका सेवेत आणणार आहे. पालिकेच्या परिवहन सेवेतून दररोज ८० हजार प्रवासी प्रवास करत आहेत.