उज्ज्वला योजनेकडे नागरिकांची पाठ
भाईंदर : एकीकडे करोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे संपूर्ण अर्थगणित कोलमडले असताना दुसरीकडे सिलिंडरची वाढती किंमतदेखील चिंतेचा विषय ठरली आहे. अशा परिस्थिती उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेल्या गरीब नागरिकांना सिलिंडर दर परवडत नसल्यामुळे त्यांनी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याला प्राधान्य दिले आहे.
भाईंदरमधील शिधावाटप कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार मीरा भाईंदरमध्ये ‘भारत गॅस’ आणि ‘हिंदुस्थान पेट्रोलियम’ या दोन कंपन्याकडून गॅस सिलिंडर वितरित केले जातात. दोन्ही वितरक मिळून मीरा-भाईंदरमध्ये एकूण १२२ लाभार्थी उज्ज्वला योजनेचा लाभ घेत आहेत. यात उत्तन गाव आणि काशी गावातील ग्रामस्थांची संख्या जास्त आहे. केंद्र शासनाने २०१६ मध्ये दारिद्रयरेषेखालील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळावी यासाठी योजनेतून गॅस वाटप करण्यात आले होते. तसेच गॅस सिलिंडरवर शासनाने अनुदान दिले होते. यामुळे लाखो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला होता. दोन वर्षांंत सिलिंडरच्या दरात प्रचंड वाढ झाल्यामुळे नागरिकांना गॅस सिलिंडर पुन्हा पुन्हा घेणे शक्य नसल्याने अनेकांनी योजनेकडे पाठ फिरवली आहे. समुद्रकिनारी वास्तव्य करत असलेल्या मच्छीमारांना आणि काशीमिरा येथील आदिवासी पाडय़ातील ग्रामस्थांनी योजनेचा गेल्या तीन वर्षांपासून लाभ घेतला आहे. गेल्या दीड वर्षांपासून रोजगार गेल्याने मोठे आर्थिक संकट आहे. अशा परिस्थितीत खर्च परवडत नसल्यामुळे चुलीवर स्वयंपाक तयार करत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात येत आहे.
मीरा-भाईंदर शहरात एकूण १२२ नागरिकांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्याकरिता अर्ज देण्यात आले होते. मात्र २०२० रोजी ही योजना शासनकडून बंद करण्यात आल्यामुळे सध्या तरी नेमकी काय परिस्थिती आहे ते आम्हाला अजून कळू शकले नाही.
-जितेंद्र पाटील, शिघा वाटप मुख्य अधिकारी
आम्हाला सध्या आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चदेखील जड झाला आहे. त्यात सिलिंडरवर इतका खर्च करणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही गेल्या कित्येक महिन्यापासून सिलिंडर तसेच ठेवले असून चुलीवरच स्वयंपाक बनवत आहोत.
-सारिका डुंगा, गृहिणी