भाईंदर :- राज्यभरात विविध ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर महापालिका सज्ज झाली आहे.शहरात करोना बाधित रुग्णांनावर उपचार करण्यासाठी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात विशेष करोना कक्ष उभारला जाणार आहे. खबरदारीच्या दृष्टीने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
मुंबईसह उपनगर मागील काही दिवसापासून करोनाबाधित रुग्ण आढळून येऊ लागले आहेत.त्यामुळे या आजाराचा धोका पुन्हा मिरा भाईंदरला निर्माण झाला आहे. सध्या शहरात एकही करोना बाधित रुग्ण आढळून आला नसला तरी येत्या दिवसात तो आढळणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे खबरदारीच्या दृष्टीने येथील यंत्रणा देखील सतर्क करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
यात भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात एक स्वतंत्र करोना कक्ष उभारण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी तुषार पडवळ यांनी दिली आहे. यात रुग्णांचे विलगीकरण व अलगीकरण केले जाणार आहे.याशिवाय शहरातील महापालिकेच्या रुग्णालय व आरोग्य केंद्रात तसेच खासगी रुग्णालय व दवाखान्यांत करोना बाधित रुग्ण समोर आल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आयुक्तांकडून रुग्णालयांची पाहणी
करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभाग व रुग्णालयाची महापालिका आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी मंगळवारी पाहणी केली. यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. याशिवाय तेथील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याचे पाहून समाधान ही व्यक्त केले.