वाढत्या रुग्णसंख्येमुळे वसई-विरार महापालिकेचा निर्णय
विरार : वसई-विरारमधील वाढती करोना रुग्ण संख्या पाहता पालिकेने पुन्हा खासगी रुग्णालयात करोना उपचारासाठी परवानगी देण्याचे ठरविले आहे. यासाठी या रुग्णालयांची तपासणी पालिकेकडून केली जाणार आहे. रुग्णवाढीचा दर वाढल्यास लवकरच खासगी रुग्णालयांतही करोना उपचार केले जातील. वसई-विरार पालिकेने दुसऱ्या करोना लाटेच्यावेळी शहरातील खासगी रुग्णालये अधिग्रहण केली होती. तसेच ३९ खासगी रुग्णालयांना परवानगी दिली होती. यामुळे नागरिकांना खासगी रुग्णालयातसुद्धा उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध झाल्या होत्या. यावेळीसुध्दा करोना रुग्णाची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. मागील केवळ आठवडाभरात २ हजारांच्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पालिकेने नुकतेच आपले तीन रुग्णालये करोना उपचार केंद्रे म्हणून सुरू केली आहेत. तसेच इतर आणखी एका रुग्णालय सुरू होण्याच्या मार्गावर आहे. असे असताना पालिकेने नुकतेच खासगी रुग्णालयांचाही आधार घेण्याचे ठरविले आहे. सध्या रुग्णसंख्या वाढत असली तरी पालिकेने तयार केलेली रुग्णालये पुरेशी ठरणार आहेत. पण रुग्णसंख्या अधिक वेगाने वाढली तर पालिकेला खासगी रुग्णालयांनाही परवानगी द्यावी लागणार असल्याचे वैद्यकीय विभागाने सांगितले आहे.
मागील लाटेत परवानगी दिलेल्या रुग्णालयांची पालिकेकडून तपासणी केली जात आहे. यातील ३ रुग्णालयांनी माघार घेतली होती. यामुळे सध्या ३६ रुग्णालये पुन्हा करोना रुग्ण उपचार केंद्र म्हणून सुरू होऊ शकतील. तसेच इतर नव्याने परवानगीसाठी आलेल्या रुग्णालयांनासुद्धा सर्व सुरक्षात्मक उपाय आणि पालिकेच्या नियमांची पूर्तता करणाऱ्या रुग्णालयांना परवानगी दिली जाणार आहे.