|| सुहास बिऱ्हाडे

रस्त्यात भांडण करून, बोलण्यात गुंतवून सोनसाखळी लंपास करण्याचे प्रकार

वसई : वसई विरार शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असून सोनसाखळी चोरांनी आता नवीन कार्यपद्धतीचा वापर सुरू केला आहे. रस्त्यातून जाणाऱ्यांच्या सोनसाखळी खेचण्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा आता थेट इमारतीच्या आवारात जाऊन आणि पादचाऱ्यांशी भांडण उकरून सोनसाखळी चोरीचे प्रकार वाढले आहेत. चालू वर्षी मेपर्यंत सोनसाखळी चोरीचे ३७ गुन्हे घडले होते, त्यापैकी २३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सोनसाखळी चोरी ही गेल्या काही वर्षांपासून सर्वच शहरांतील पोलीस ठाण्यांची डोकेदुखी ठरली आहे. दुचाकीवरून भरधाव वेगाने यायचे आणि रस्त्यावरुन पायी जाणाऱ्यांच्या गळ्यातली सोनसाखळी चोरायची ही पारंपारिक पद्धत होती. मात्र पोलिसांनी निर्माण केलेल्या जनजागृतीमुळे नागरिक सावध होऊ लागले. त्यामुळे चोरांनी नवीन कार्यपद्धती सुरू केली आहे. त्यातील दोन कार्यपद्धतीने सोनसाखळी चोरीचे गुन्हे होत असतात. त्यापैकी एक पद्धत म्हणजे नागरिकांवर पाळत ठेवायची आणि ते फिरून आपल्या इमारतीच्या आवारात शिरताच पाठीमागून जायचं आणि त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास करायची. या कार्यपद्धतीने अनेक गुन्हे शहरात घडू लागले होते. आता आणखी एक नवीन कार्यपद्धती सोनसाखळी चोरांनी शोधून काढली आहे.

या नव्या पद्धतीत सोनसाखळी चोर रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांशी भांडण उकरून काढतात. मुद्दाम झपाटप करतात आणि हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास करतात. याच पद्धतीत समोरच्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवून ठेवतात आणि त्याच्या गळ्यातील सोनसाखळी काढून घेतात.  ही पद्धत सोपी आणि कमी धोक्याची असते, असे पोलिसांनी सांगितले. वसई पोलिसांनी अटक केलेल्या एका टोळीच्या अटकेनंतर ही बाब समोर आली. एका प्रकरणात या दोन सोनसाखळी चोरांनी आइसक्रीमच्या दुकानात बसलेल्या महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केली होती. तर काही महिन्यांपूर्वी तामतलाव येथे एका पादचाऱ्याशी भांडण करून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केली होती.

या कार्यपद्धतीबाबत माहिती देताना परिमडंळ २ चे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी सांगितले की, पोलिसांच्या वाढलेल्या गस्ती आणि नागरिकांमध्ये जनजागृती आल्यामुळे चोरांनी आपला पारंपरिक मार्ग बदलला आहे. पाळत ठेवून इमारतीच्या आवारातील ज्येष्ठ नागरिकांना ते लुटतात. याशिवाय रस्त्यात एकट्या माणसाला गाठून त्यांच्याशी भांडण उकरून त्याच्याकडील सोनसाखळी लंपास केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन उपायुक्त पाटील यांनी केले आहे.

चोरांना पकडण्याचे प्रमाण वाढले

परिमंडळ २ आणि ३ मध्ये मे २०२१ पर्यंत सोनसाखळी चोरीच्या ३७ घटना घडल्या आहेत. त्यापैकी २३ सोनसाखळी चोरीच्या घटनांची उकल करण्यात यश आले आहे. मागील वर्षी ३१ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यापैकी केवळ ८ घटनांची उकल झाली होती. सातत्याने केली जाणारी जनजागृती, वाढवलेल्या गस्ती आणि जागोजागी लावलेले कॅमेरे यामुळे सोनसाखळी चोरांना पकडणे सोपे झाले असल्याची माहिती उपायुक्त संजय पाटील यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेपेक्षा यंदा सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असली तरी सोनसाखळी चोरांना पकडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे ते म्हणाले.