विरार : विरारमध्ये एक आगळी वेगळी चोरी समोर आली आहे. चोरट्यांनी एका लसूनच्या गोदामावर डल्ला मारत चक्क दोन लाख ४० हजाराचा माल लंपास केला आहे. यासंदर्भात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, विरार पूर्व मनवेल पाडा परिसरात राहणारे भाजीव्यापारी चैतन्य पडूलकर यांचे श्रीसाई पूर्णानंद ट्रेडर्स नावाचे गोदाम आहे. गुरूवारी त्यांनी घाऊक विक्रेत्याकडून लसूनचा २ लाख ४० हजाराचा माल मागविला होता. माल गोदामात मध्ये ठेवून रात्री ते आपल्या घरी गेले. याच रात्री १२ नंतर काही चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचा आढावा घेत. त्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे फिरवले आणि दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. काही वेळच्या आताच त्यांनी सर्व माल हा एका गाडीत भरून पोबारा केला. चैतन्य जेव्हा सकाळी पुन्हा गोडावूनवर आले तेव्हा सर्व घटना समजली. त्यांनी विरार पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी माहिती दिली की, या गुन्ह्यातील महत्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. लवकरच या चोरीचा छडा लावला जाईल.