Vasai Dahi Handi 2025 Celebration : वसई: पावसाचा जोर असताना ही वसईच्या ग्रामीण भागात पारंपारीक पद्धतीने दही हंडी उत्सव साजरा करण्यात आला. देव देवतांच्या वेशभूषा, गोपाळ कृष्णाच्या नामाचा गजर करीत गावकीच्या पथकांनी या हंड्या फोडल्या. वसईच्या शिरगाव, कोपरी, नारंगी, डोंगरपाडा शिरसाड, चांदीप, कामण, जूचंद्र, चंद्रपाडा, यासह इतर गावांमध्ये मध्यरात्री मोठ्या उत्साहात कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

त्यानंतर शनिवारी सकाळपासून गावात गोपाळ काला व दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठीची लगबग सुरू झाली होती. गाव पाड्यात विविध ठिकाणी दहीहंड्या बांधल्या होत्या. याशिवाय ढोल ताशाच्या गजरात मिरवणुका काढत महिला वर्ग , तरुणाई, बालगोपाल यांनी ठेका धरला होता.

तर काही ठिकाणी देव देवता व विविध प्रकारच्या वेशभूषा साकारून त्यावर नृत्य सादर करीत पारंपारीक सांस्कृतिचे दर्शन घडविले. गावकीची पथके एका वर एक मनोरे रचत असताना एकमेकांना सहकार्य करीत तयार केलेल्या कृष्णाला चढवत हंड्या फोडण्यात आल्या. हा सोहळा पाहण्यासाठी भर पावसात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.शहरी भागासह ग्रामीण भागातही दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पहायला मिळाला.