भाईंदर :-दहिसर पथकर नाक्याचे स्थलांतर केल्याच्या दिवसापासून पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या उभी राहत असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे प्रशासनाच्या निर्णयावर प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातआहे. दहिसर पथकर नाक्यावर निर्माण होणारी वाहनांच्या गर्दीची समस्या दूर करण्यासाठी हा पथकर नाका स्थलांतरित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. यासाठी वर्सोवा पुलापुढील जागेचा पर्यायही पाहण्यात येत होता. मात्र यास स्थानिक भूमिपुत्र संघटनेकडून याला कडाडून विरोध करण्यात आला होता.
परिणामी १३ नोव्हेंबर रोजी पूर्वीच्या टोल नाक्यापासून अवघ्या ५० मीटर अंतरावरच हा टोल स्थलांतरित करण्यात आल्याचे दिसून आले. यावेळी खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हेही पथकर नाक्यावर उपस्थित होते. त्यांनी वाहतूक कोंडीची समस्या आता कायमची सुटेल असा दावा केला होता. तर शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आतिषबाजी करत जल्लोषही केला होता.
मात्र, मंत्री घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर अवघ्या तासाभरातच पथकर नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. सायंकाळच्या सुमारास या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी प्रवाशांना अर्ध्या तासांहून अधिक वेळ लागत होता. विशेष म्हणजे, पथकर नाका पुढे स्थलांतरित झाल्यामुळे आता मेट्रो स्थानकाखालीच कोंडीची नवी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांकडून परिवहन मंत्र्यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक नागरिकांनीही समाजमाध्यमांवर याबाबत संताप व्यक्त केला आहे.
पथकर नाक्याच्या वादात मेहतांची उडी
मिरा-भाईंदरच्या हद्दीत पथकर नाका होऊ देणार नाही. दहिसर पथकर नाका तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आला असून पुढील जागेचा शोध सुरू असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. त्यामुळे हा पथकर नाका घोडबंदर येथील वर्सोवा विभागात स्थलांतरित होण्याची शक्यता आहे.मुंबईचा पथकर नाका मिरा-भाईंदरच्या माथी येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पथकर नाका
मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पथकर नाक्याच्या स्थलांतराला वसई विरारमधील स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. या दुसरीकडे राजकीय दृष्ट्याही हा विषय चर्चेचा मुद्दा बनू लागला आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय आणि स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवीन पथकर भरणा प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला मंत्री सरनाईकांनी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत दिल्या आहेत. त्यामुळे सध्याचा पथकर नाका कायमस्वरूपी बंद करणे शक्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
