रूळ ओलांडताना दोन महिन्यांत १९ दुर्घटना

वसई : करोनाकाळात रेल्वेतून अत्यावश्यक सेवा वगळता इतर प्रवाशांची वर्दळ कमी झाली आहे. त्यामुळे वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे रूळ ओलांडणे, रेल्वे मार्गातून चालणे व लोकलमधून पडून अपघात होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. मागील दोन महिन्यांत मीरा रोड ते वैतरणा या स्थानकांच्या दरम्यान केवळ १९ अपघातांच्या घटना घडल्या आहेत.

वसई रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीरा रोड ते वैतरणा यादरम्यानच्या सात रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. या लोहमार्गावर दरवर्षी मोठय़ा प्रमाणात अपघाताच्या घटना घडत असतात. यात रेल्वे रूळ ओलांडून जाणे, रेल्वे रुळावरून चालणे, लोकलमध्ये लटकून प्रवास करणे अशा विविध प्रकारे अपघात घडतात. परंतु यंदाच्या वर्षीही करोना संसर्गाची दुसरी लाट आल्याने रेल्वेतून प्रवास करण्यावर ही निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा ही अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी व मालवाहतूक यासाठी सुरू आहे.

दररोज लाखोंच्या संख्येने प्रवाशांनी होणारी वर्दळ ही कमी झाली आहे. त्यामुळे रेल्वे मार्गात होणाऱ्या अपघाताच्या घटनाही कमी झाल्या आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरीस टाळेबंदी लागू केली तेव्हापासून ते आतापर्यंत १९ अपघात झाल्याच्या घटना घडल्या असून या अपघातात जास्त करून रेल्वे रूळ ओलांडणे व रेल्वे मार्गात चालणे यामुळे हे अपघात झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

करोनामुळे रेल्वेची वाहतूकही कमी प्रमाणात सुरू आहे. एरवी प्रवाशांची वर्दळ जास्त असते. त्यातील काही प्रवासी हे रेल्वे पुलाचा वापर न करता थेट रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करतात म्हणून अपघातासारखे प्रकार घडतात. आता हे प्रमाण कमी झाले आहे.

– सचिन इंगवले, रेल्वे पोलीस निरीक्षक, वसई