करोनापाठोपाठ साथीच्या आजारांचे आव्हान; औषध फवारणीबरोबरच जनजागृती

विरार : वसई-विरार परिसरात करोना प्रादुर्भावाने काहीसा दिलासा दिला असला तरी तिसऱ्या लाटेचे सावट आणि पावसाळ्यातील साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान कायम आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने डेंग्यू, हिवताप निर्मूलन मोहीम राबविणार आहे. या मोहिमेंतर्गत पालिका नागरिकांच्या घरोघरी जाऊन पाहणी करणार असून नागरिकांना पावसाळ्यात फोफावणाऱ्या आजारापासून सुरक्षा मिळणार मिळणार आहे.

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे डेंग्यू, हिवतापाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिका आधीपासूनच सावध झाली आहे. पावसाळ्यातील आजारांवर वेळीच अंकुश लावला तर साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवता येईल म्हणून पालिका सतर्क झाली आहे. या मोहिमेअंतर्गत वसई-विरार महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन पाणी साठवणुकीच्या भांडय़ांची तपासणी करणार आहेत. यात संशयित ठिकाणी औषध फवारणीसोबत नागरिकांनी घ्यायच्या काळजीची माहितीही दिली जाईल.

सध्या करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. यामुळे पालिकेला काहीसा दिलासा मिळाला आहे. यामुळे आता इतर पावसाळी आजारांवरसुद्धा नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने तयारी दाखवली आहे. मागील वर्षभरात शहरात डेंग्यू आणि हिवतापाचा फारसा प्रादुर्भाव जाणवला नाही. अगदी कमी प्रमाणात रुग्ण आढळून आले होते. कारण पालिकेने करोनाकाळात विविध सर्वेक्षण, औषध फवारणी आणि साफ सफाईकडे विशेष लक्ष दिले होते. त्याचबरोबर करोनाच्या भीतीने नागरिकांनीसुद्धा आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली होती. यामुळे मागील वर्षी डेंग्यू आणि हिवतापाचे रुग्ण प्रमाण कमी होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. डबक्यातील पाणी अस्वच्छ व गढूळ असल्याने त्यात कीटकांचा प्रादुर्भाव वाढून मच्छर व डासांचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरू नये यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाकडून घरोघरी जाऊन डेंग्यूच्या अळ्यांची पाहणी करण्यात येणार आहे. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी महापालिका प्रशासनाकडून विशेष ती सर्व खबरदारी घेण्यात येत असल्याचे पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश चौहान यांनी सांगितले. त्याचबरोबर गृहसंकुलांना त्यांच्या पाण्याच्या स्रोतांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.