वसई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र वसई तालुक्यात ई-केवायसी तसेच फार्मर आयडी नसल्याने तब्बल ३४३ शेतकऱ्यांना अजूनही बनुकसान भरपाई मिळू शकलेली नाही.वसई तालुक्यातील ग्रामीण पट्ट्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. स्थानिक शेतकऱ्यांकडून भात, पालेभाज्या, केळी, तसेच विविध प्रकारच्या फुलांची शेती केली जाते. मात्र, यंदा सप्टेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात होती.

या मागणीची दखल घेत कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून तालुक्यातील शेतांची पाहणी १५३.८७ हेक्टर शेतीच्या नुकसानीचा अहवाल शासन दरबारी पाठविण्यात आला. तर, १४ लाख ५९ हजार अनुदानाची मागणी करण्यात आली होती. यानुसार महाराष्ट्र सरकारकडून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची रक्कम वितरित करण्यात आली होती.

वसई तालुक्यातील ७७५ शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून मंजूर करण्यात आली होती. पण, ई-केवायसी किंवा फार्मर आयडी नसल्यामुळे ७७५ पैकी फक्त ४३२ शेतकऱ्यांना नुकसान ८ लाख ६८ हजारांची भरपाई मिळाली आहे. तर ३४३ शेतकरी अजूनही आर्थिक मदतीपासून वंचित आहेत.

ऑक्टोबरमधील नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव सादर

ऑक्टोबर महिन्यातही कोसळलेल्या पावसामुळे वसई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांची पाहणी करून १५३.८७ हेक्टर शेतीच्या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. यात १ हजार ६४२ शेतकऱ्यांसाठी ४२ लाख ११ हजार रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.

तालुक्यातील बहुतांश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून वितरीत करण्यात आलेली नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे. पण, ज्या शेतकऱ्यांना ई-केवायसी किंवा फार्मर आयडी अशा तांत्रिक अडचणींमुळे मदत मिळालेली नाही. अशा शेतकऱ्यांसाठी शिबिर आयोजित करून त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. सूरज जाधव, तालुका कृषी अधिकारी, वसई