वनखात्याला जमीन हस्तांतर नाही, जुन्या पुलाचाही अडथळा

वसई: मंजुरी मिळून आठ वर्षे उलटली तरी भाईंदर आणि वसईला जोडणाऱ्या भाईंदर खाडी पुलाच्या कामाची विघ्ने दूर होण्याची चिन्हे दिसत नाही. मिठागराच्या जागेवरील शिलोत्तरांना मोबदला मिळालेला नसून दुसरीकडे वनखात्याला जागाही मिळालेली नाही. दरम्यान, जुना पूल तोडल्याशिवाय नवीन पुलाच्या कामाला सुरुवात होणार नसल्याचे ‘एमएमआरडीए’ने सांगितल्याने पुलाचे काम आणखी लांबणीवर पडणार आहे.

 वसई-विरार शहराला मुंबईशी जोडणाऱ्या भाईंदर खाडीवर ‘एमएमआरडीए’तर्फे सहा पदरी पूल बांधला जाणार आहे. २०१३ मध्ये या कामाला अंतिम मंजुरी मिळाली होती. हा पूल कांदळवन वनक्षेत्र आणि खारभूमीच्या मिठागरातून जाणार आहे. या कामासाठी एमएमआरडीएने  ‘मुंबई सागरी मंडळ’ (एमएमबी), ‘इनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडिया’ (आयडब्ल्यूएआय) आणि ‘महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण’(एमसीझेडएमए) च्या परवानग्या मिळवल्या आहेत. एप्रिल महिन्यात खारभूमी विभागाने ९.८६ हेक्टर जागा देण्यास संमती दर्शवली होती. त्यामुळे पुलाच्या कामाचा अडथळा दूर झाला होता. त्यानंतर एमएमआरडीएने खारभूमी विभागाला या जागेच्या मोबदल्यात ३२ कोटी ४३ लाख रुपये देण्याचे मंजूर केले होते. परंतु ते काम संथगतीने  सुरू असल्याने निविदा प्रक्रिया सुरू झाली नव्हती. एमएमआरडीएनने मिठागरांना जागेचा मोबदला अदा केला होता. मात्र अद्याप या जागेवरील शिलोत्तरांना मोबदला मिळालेला नाही. वनखात्याला पर्यायी जमीन देण्याची प्रक्रिया देखील पूर्ण झालेले नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. एमएमआरडीएची आढावा बैठक झाली.  या खाडीवरून नायगाव आणि भाईंदर खाडीवर असलेला जुना रेल्वे पूल तोडल्याशिवाय कामाला सुरुवात करता येणार नाही असे सांगण्यात आल्याची माहिती खासदार राजेंद्र गावित यांनी दिली.

जुन्या पुलाचा काय संबंध?

नायगाव आणि भाईंदर दरम्यान असलेल्या खाडीवरील रेल्वेचे दोन पूल आहेत. हे पूल ब्रिटिशांनी बांधले होते. त्यावरून विरापर्यंत रेल्वे मार्ग नेण्यात आला होता. नंतर चौपदरीकरण झाल्यानंतर नवीन खाडीत नवीन रेल्वे पूल बांधण्यात आला होता. या जुन्या पुलावरून हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव होता. मात्र तो रद्द करून जूना पूल भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या खाडीवर दोन जुने पूल आहेत. त्यापैकी एक पूल रेल्वेने पाडला असून दुसरा पूल अद्याप पाडलेला नाही. मात्र प्रस्तावित रेल्वे पूल पश्चिमेकडून जाणार असून जुन्या पूलाचा संबंध काय असा सवाल माजी महापौर नारायण मानकर यांनी केला आहे. पुलाच्या कामाचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असून वनखात्याला पर्यायी जमीन आणि मिठागरावरील शिलोत्तरांना लवकरात लवकर मोबदला देणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. कामे पूर्ण झाली नाहीत तर पुलाच्या निर्मितीसाठी विलंब होऊन खर्च आणखी वाढणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

भाईंदर खाडीवर असलेला जून पूल तोडल्यानंतर नवीन पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी रेल्वे आणि एमएमआरडीएकडे पाठपुरावा करत आहोत. लवकरच या कामाला प्रारंभ होईल

राजेंद्र गावित, खासदार, पालघर

भाईंदर खाडीवर दोन जुने पूल आहेत. त्यापैकी एक पूल आम्ही तोडला आहे. दुसरा पूल देखील लवकर तोडला जाईल. नवीन पुलाच्या कामाच्या मार्गात जुन्या पुलाचा अडथळा असेल तर पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी समन्वय साधून त्यावर तोडगा काढता येईल.

सुमीत ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

 जुन्या पुलाचा अडथळा असणं हे योग्य वाटत नाही कारण नव्या पुलाचा मार्ग वेगळा आहे. वनखात्याला जागा आणि मिठागराच्या जागेवरील शिलोत्तरांना लवकर मोबदला द्यावा. प्रकल्पाला आधीच उशीर झाला आहे. त्यामुळे हे प्रश्न लवकरच निकाली काढावेत

नारायण मानकर, माजी महापौर, वसई-विरार महापालिका