गणरायाच्या आगमनाला खड्डय़ांचे विघ्न

अवघ्या सात दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सर्वत्र सुरू आहे.

गणेशोत्सवाआधी खड्डे बुजविण्याची नागरिकांची मागणी

वसई : अवघ्या सात दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सर्वत्र सुरू आहे. मात्र, वसई-विरार शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. पालिकेकडून अजूनही रस्ते दुरुस्तीचे काम सुरू झाले नसल्याने गणेशाच्या आगमनाच्या मार्गात खड्डय़ांचे विघ्न निर्माण झाले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात वसई-विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात रस्त्यावर खड्डे पडतात. यंदाही शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, गल्ल्या अशा विविध ठिकाणी मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. वसई पूर्व पश्चिम, वसई पूर्वेतील भोयदापाडा, सातीवली, गोखीवरे, गावराईपाडा, तर नालासोपारामधील संतोष भवन, धानिवबाग, वालाईपाडा, तुळिंज रोड, नालासोपारा पूर्व पश्चिम उड्डाणपूल, विरारमधील मनवेलपाडा, गासकोपरी, कोपरी, चंदनसार, शिरगाव, भाटपाडा, मनवेलपाडा विजय नगर, विरार पश्चिम नायगाव पूर्वेतील मुख्य रस्ता, टीवरी ते भोयदापाडा रस्ता यासह इतर ठिकाणच्या भागात खड्डे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यांचे योग्य पद्धतीने डांबरीकरण होत नसल्याचे शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेवरून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. गणेशोत्सवही आता जवळ आला आहे. परंतु रस्त्यावरील खड्डय़ांची डागडुजी अजूनही पालिकेकडून करण्यात आली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे खड्डे पडलेल्या रस्त्यावरून घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे आगमन कशा प्रकारे करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या आधी शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतु पाऊस सतत सुरू असल्याने कामात अडथळे येतात. गणेशोत्सवाच्या आधी शहरातील खड्डे दुरुस्त करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

– राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Disruption of pits on arrival of ganeshotsav ssh

ताज्या बातम्या