वसई: वसई विरार शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी वसईत वृक्ष प्राधिकरण विभागाकडून वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम  हाती घेण्यात येत आहे. रस्त्याच्या मध्य भागी असलेल्या दुभाजकांमध्ये व प्रमुख सर्कलच्या मध्ये विविध प्रकारची शोभिवंत झाडांची लागवड केली जाणार आहे.त्यामुळे येत्या वर्षांत दुभाजकही सौंदर्याने फुलणार आहेत. वसई विरार शहरात विविध प्रकारच्या कारणांमुळे प्रदूषण वाढू लागले आहे. हे प्रदूषण नियंत्रणासोबतच त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाच्या अंतर्गत शहराला प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी तसेच हवेतील प्राणवायूचे (ऑक्सिजन) प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेने यंदा शहराच्या विविध ठिकाणच्या रस्त्याच्या मध्ये असलेल्या दुभाजकांच्या मध्ये वृक्ष लागवड करण्याचा निर्णय  घेतला आहे. ही वृक्ष लागवड करण्यासाठी पालिकेला शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ  हवा कार्यक्रमांतर्गत  (नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम) ८४ लाख रुपये इतका निधी यासाठी खर्च केला जाणार आहे.

वसई विरार शहराअंतर्गत जोडणाऱ्या रस्त्याच्या मध्ये दुभाजक तयार केले आहेत. काही ठिकाणी याआधी वृक्ष लागवड केली होती. तर काही ठिकाणी दुभाजक ही मोकळेच आहेत. अशा दुभाजकांची निवड करून त्यात विविध प्रजातीची शोभिवंत झाडांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाकडून देण्यात आली आहे. यात वसंत नगरी, शांती पार्क यासह इतर ठिकाणच्या १६ सर्कलमध्ये व फनफिस्टा ते पाटणकर पार्क यासह इतर ठिकाणच्या दुभाजकांमध्ये वृक्ष लागवड केली जाणार आहे. या वृक्ष लागवडीमुळे  दुभाजकही हिरवाईने नटणार असून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

वृक्ष प्राधिकरण विभागाकडून शहरातील प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने दुभाजक व विविध ठिकाणच्या सर्कलमध्ये वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षांत ही वृक्ष लागवड टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहे.

नीशा महाजन, सहायक आयुक्त वृक्ष प्राधिकरण विभाग पालिका