वसई-विरार महापालिकेत १७९४ पदे रिक्त; मंजुरीसाठी प्रस्ताव शासनाकडे
प्रसेनजीत इंगळे
विरार : मागील १२ वर्षांपासून रखडलेल्या वसई-विरार महानगरपालिका कर्मचारी भरतीचा मार्ग मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली लागल्यानंतर सुकर झाला आहे. पालिकेने नव्याने बिंदुनामावली तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवली आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर पालिकेच्या भरतीप्रक्रियेला गती प्राप्त होणार आहे. पालिकेच्या एकूण २८५२ पदांपैकी १७९४ पदे अजूनही रिक्त आहेत.
वसई-विरार महापालिकेची स्थापना २००९ साली झाली. ९ सप्टेंबर २०१४ रोजी पालिकेचा आकृतिबंध मंजूर झाला होता. त्यानुसार २ हजार ८५२ पदे मंजूर आहेत. यात अ गटातील २८८ पदे मंजूर असून पालिकेकडून ४ आणि शासनाकडून केवळ ६ पदांची भरती केली आहे.
यात अजूनही २१८ पदे रिक्त आहेत. तसेच ब गटातील १५८ पदे मंजूर आहेत. यातील पालिकेने एक तर शासनाकडून ११ पदे भरली आहेत, अजूनही या गटातील १४६ पदे रिक्त आहेत. क गटातील १७०३ पदे मंजूर आहेत. यातील पालिकेने ४१७ तर शासनाकडून एकही पद भरले नाही. यामुळे या गटातील १२८६ पदे रिक्त आहेत. तर ड गटातील ७६३ पदे मंजूर असून पालिकेकडून ६१९ तर शासनाकडून एकही पद भरण्यात आले नाही. या गटात १४४ पदे रिक्त आहेत. अशा प्रकारे पालिकेच्या एकूण २८५२ पदांपैकी १७९४ पदे अजूनही रिक्त आहेत. यातील बहुतांश पालिकेने भरलेली पदेही ठेका पद्धतीने भरली आहेत. यामुळे कायमस्वरूपी सेवेतील हाताच्या बोटावर मोजण्याइतके कर्मचारी पालिकेत कार्यरत आहेत.
मागील १२ वर्षांत पालिकेची लोकसंख्या २० लाखांच्या पार गेली आहे. यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे कामाचा व्याप वाढत आहे. पालिकेत विविध विभागांत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे पालिकेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातही पदावर असलेले कर्मचारी हे कुशल आणि पात्रतायोग्य नसल्याने कामात अनेक त्रुटी राहत आहेत.
महानगरपालिकेचा आकृतिबंध २०१४ मध्ये मंजूर झाला होता, तेव्हापासून आजतागायत पालिकेत कर्मचारी भरती झाली नाही. काम चालवण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना प्रभारी पदभार देऊन कामे केली जात आहेत. याचा परिणाम मात्र कामाच्या गुणवत्तेवर होत असल्याचे दिसून आले आहे. यात पालिकेने २०१६ मध्ये बिंदुनामावली तयार करून शासनाकडे पाठवली होती. पण मराठा आरक्षणाचा मुद्दा असल्याने नवीन कर्मचारी भरती अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. या संदर्भात विभागीय कोकण आयुक्तांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेला ठेका पद्धतीने कंत्राटी कामगार घेऊन काम करावे लागत आहे.
पण नुकताच मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयाने मार्गी लावल्याने पुन्हा पालिकेच्या भरती प्रक्रियेला उभारी आली आहे. यात पालिकेकडून सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे आरक्षणाच्या प्रवर्गानुसार टक्केवारी सदर करत बिंदुनामावली सदर केली आहे. यावर अजूनही कोणताही निर्णय झाला नाही. पण लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बिंदुनामावलीला शासनाची मंजुरी मिळाल्यास पालिकेला लागलेले ठेका कामगारांचे ग्रहण सुटणार आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आस्थापना विभागाकडून सांगण्यात आले आहे.
बिंदुनामावली शासनाकडे पाठविण्यात आली आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास पालिकेकडून तातडीने शासनाच्या निर्देशानुसार भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
– गंगाथरन डी. आयुक्त, वसई विरार महानगरपालिका