पाण्याचे योग्य पद्धतीने मोजमाप करण्याचे उद्दिष्ट

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे या उद्देशाने देण्यात येणाऱ्या नवीन नळ जोडणीना इलेक्ट्रॉनिक मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याच प्रकारे शहरातील उपलब्ध असलेल्या वाणिज्य नळ जोडणीला देखील इलेक्ट्रॉनिक मीटर लावण्याकरिता प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीकडुन पाणी पुरवठा करण्यात येतो. यात स्टेम प्राधिकरणकडून ८६ द. ल.ली. पाणी पुरवठा केला जातो तर   एमआयडीसीकडून ११५ द.ल.ली.पाणीपुरवठा होतो. मात्र यातदेखील गेल्या काही दिवसापासून पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे प्रशासनाकडून राज्य शासनाकडे अधिक पाण्याची मागणी करण्यात येत आहे.त्यामुळे राज्य शासनाकडून पाणी उपलब्ध होईपर्यंत पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या दुष्टीने प्रशासनाकडून पावले उचलण्यात येत आहे.याकरिता पाण्याचे मोजमाप करण्याकरिता अडचण निर्माण करणाऱ्या मीटरला बदलून त्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक मीटर लावण्याचा निर्णय प्रशासनकीय पातळीवर घेण्यात आला आहे.

सध्य स्थितीत मीरा-भाईंदर शहरात एकूण ४३ हजार ७१ इतक्या नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. यातील घरगुती नळ जोडण्या ३९ हजार ८०३ इतक्या असून वाणिज्य नळ जोडण्याची संख्या  ३ हजार २४५ इतकी आहे. या नळ जोडणीवर पालिका प्रशासनाकडून कर आकारणी करण्यात येते. यात प्रति १० हजार लीटर करीता घरगुतीवर  १३ रुपये इतका तर वाणिज्य नळ जोडणीवर  ५० रुपये इतका कर आकारला जातो.मात्र वाणिज्य नळजोडणीला करण्यात येणारा पाणी पुरवठा हा अपेक्षेपेक्षा  अधिक होत असल्याची तक्रार वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे अश्या नळ जोडण्याना संपूर्णत: इलेक्ट्रॉनिक करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.तसेच त्याच सह यापुढे देण्यात येणाऱ्या घरगुती नळ जोडण्याना देखील इलेक्ट्रॉनिक मीटर  लावण्यात येणार आहे.

कंत्राट दराने मीटर करीता सादर केलेला दर.

नळ जोडणी संख्या   प्रति नळजोडणी मीटर दर

१५ मिमी            १७५६                       १५२४८

२०मिमी                १                           १६०५५

२५ मिमी             ११६७                       १८८९६

४०मिमी                १                            २३२७५

५० मिमी               ३                            ४०८५०

पाच कोटी ३८लाख अंदाजित खर्च

महानगरपालिका क्षेत्रात सुमारे तीन हजार २४५ इतके वाणिज्य नळजोडण्या आहेत.  अश्या जोडण्यांना इलेक्ट्रॉनिक मीटर लावण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला आहे. याकरिता सुमारे  पाच कोटी ३८ लाख ३८ हजार ९३० रुपये इतका अंदाजित खर्च ठरवण्यात आला आहे.तसेच या संबंधित प्रस्ताव स्थायी समिती समोर सादर करण्यात आला असून येत्या महासभेत या ठरावाला अंतिम मंजुरी देण्यात येईल.

मीरा भाईंदर शहरात पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याकरिता इलेक्ट्रॉनिक मीटर लावणे गरजेचे आहे. त्यामुळे  वाणिज्य नळ जोडणी असलेल्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीटर लावण्याकरिता आम्ही प्रस्ताव तयार केला असून तो स्थायी समिती समोर सादर केला आहे. या प्रस्तावावर चर्चा करून येत्या महासभेत या विषय चर्चेकारिता येण्याची शक्यता आहे.

दीपक खांबित — कार्यकारी अभियंता,पाणी पुरवठा विभाग