कारवाईबाबतचा ठराव कागदावरच; नागरिकांचा पायी प्रवास कठीण
भाईंदर : मीरा भाईंदर शहरात रस्त्यालगत तयार करण्यात आलेल्या पदपथावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाल्याने नागरिकांना पायी प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करत असताना कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील वाढत्या इमारती व वाहनांची संख्या पाहता प्रशासनाकडून मोठे रस्ते व त्यालगत पदपथांची निर्मिती करण्यात येत आहे. याकरिता प्रशासनाचे कोटय़वधी रुपये खर्च होत असून त्यांच्या देखभाल दुरुस्तीकरिता लाखो रुपये खर्च करण्यात येत आहे. हा खर्च होत असतानादेखील पदपथावर गाडय़ा दुरुस्तीचे गॅरेज, वाहनतळ, फेरीवाले आणि अतिक्रमण वाढल्याने नागरिकांवर नाहक त्रास सहन करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे पदपथावरील वाढते अतिक्रमण हटवून नागरिकांकरिता मार्ग मोकळा करण्यात यावा, असा पालिका महासभेत ठरावदेखील करण्यात आला आहे. मात्र या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे शहरातील पदपथ गायब झाले असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पदपथावरील अतिक्रमण हे प्रामुख्याने मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेरील मार्गावर दिसून येत आहे. शिवाय मुख्य मार्ग, ज्योती पार्क आणि नयानगर परिसरातदेखील अतिक्रमण दिसून येत असल्यामुळे ते त्वरित हटवण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात प्रतिक्रिया घेण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तो स्वीकारला नाही.