अग्निशमन दलाच्या दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात
वसई: वसई पश्चिमेतील पाचूबंदर येथील कचराभूमीच्या ठिकाणी पुन्हा एकदा आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविले.
वसई पश्चिमेतील भागात पाचूबंदर परिसर आहे. या भागात मोठय़ा संख्येने नागरी वस्ती आहे. या नागरी वस्तीच्या शेजारीच कचरा टाकण्यासाठी कचराभूमी तयार केली आहे. या आजूबाजूच्या भागात गोळा होणारा कचरा या ठिकाणी आणून टाकला जात आहे. मोठय़ा प्रमाणात हा कचरा दररोज येथे टाकला जातो. मात्र या कचऱ्याला अधूनमधून आगी लागण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात धूर नागरी वस्तीत पसरत आहे. दुसरीकडे दुर्गंधीचासुद्धा सामना येथील नागरिकांना करावा लागतो.
मध्यंतरी सातत्याने आगी लागण्याचे प्रकार घडत असल्याने पालिकेने येथील कचरा गोळा करून दुसऱ्या कचराभूमीवर नेला होता. त्यानंतर आगी लागण्याचे प्रकार थांबतील असे वाटले होते. परंतु पुन्हा एकदा या ठिकाणच्या भागात कचरा टाकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास लागल्याची घटना घडली. आगीची तीव्रता अधिक असल्याने आगीच्या व त्यातून निघणारा धूर हा आजूबाजूच्या भागात पसरत होता. जर आग विझली नाही तर पूर्ण रात्रभर हा धूर धुमसत राहण्याची शक्यता होती. यासाठी येथील नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान दाखल होऊन अवघ्या एक दीड तासात आग आटोक्यात आणली.
या भागात पुन्हा एकदा आगी लागण्याचे प्रकार सुरू झाल्याने या धुराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांना श्वसन, फुफ्फुसाचे आजार होण्याची शक्यता असल्याचे येथील जागरूक नागरिक राजेश हेटय़ा यांनी सांगितले आहे. या आजूबाजूला नागरी वस्ती यासह मतिमंद मुलांची शाळा ही यासाठी या कचऱ्याचा प्रश्न पालिकेने मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
