वसईच्या पाचुबंदर स्मशानभूमीतील गॅसदाहिनी सुरू

वसई-विरार महापालिकेच्या स्मशानातील दुसरी गॅसदाहिनी वसईच्या पाचुबंदर येथील स्मशानभूमीत सुरू करण्यात आली आहे.

वसई: वसई-विरार महापालिकेच्या स्मशानातील दुसरी गॅसदाहिनी वसईच्या पाचुबंदर येथील स्मशानभूमीत सुरू करण्यात आली आहे. गॅसदाहिनीत एका सिलिंडरमध्ये किमान ३ मृतदेहांचे दहन केले जाणार आहे. यामुळे मोठी आर्थिक बचत होणार आहे. यापुर्वी पालिकेकडे नालासोपारा आचोळे येथील स्मशानभूमीत एक गॅसदाहिनी होती. आणखी तीन स्मशानभूमीत गॅस दाहिन्या बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

करोनाचा संसर्ग वाढल्याने मृतदेहांची संख्या वाढली आहे. पालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार दिवसाला सरासरी ५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू होतो. या व्यतिरिक्त करोना संशयित आणि अन्य मृतदेहांची संख्या जास्त आहे. करोनाच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेने ८ स्मशानभूमी राखीव ठेवल्या आहेत. मृतदेहांची संख्या वाढल्यामुळे पालिकेला महिन्याला सरासरी १ हजार टनांहून अधिक लाकडांची आवश्यकता भासू लागली आहे.

दुसरीकडे लाकडांची मागणी वाढल्याने लाकडांची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे पालिकेने आता तातडीने ४ ठिकाणी गॅस दाहिनी बसविण्याचा निर्णय घेतला होता. वसई पश्चिमेकडील पाचूबंदर, वसई पुर्वेतील नवघर, नालासोपारा पश्चिम येथील समेळपाडा आणि विरार पश्चिमेकडील स्मशानभूमीत या गॅसदाहिन्या बसविण्यात येणार आहेत. एका गॅसदाहिनीची किंमत सुमारे ३३ लाख रुपये एवढी आहे. यापैकी वसई पश्चिमेच्या पाचुबंदर येथील गॅसदाहिनीचे काम पूर्ण झाले असून तिचा वापर सुरू झाला आहे.

लाकडांची होणार बचत

वसई-विरार शहरात एकूण ९९ स्मशानभूमी आहेत. त्यापैकी ४६ विकसित आणि ४७ अविकसित आहेत. एका मृतदेहाचे दहन करण्यासाठी साधारण साडेचारशे ते पाचशे किलो लाकडे लागतात. त्यामुळे  एका मृतदेहासाठी सुमारे अडीच हजार रुपयांची लाकडे लागतात. शहारातील स्मशानभूमीत मृतदेहांच्या दहनासाठी महिन्याला सरासरी साडेतीनशे ते चारशे टन एवढी लाकडे लागत होती. पालिकेने वनविभागाकडून थेट लाकडे विकत घेण्यास सुरुवात केली. परंतु यामुळे पर्यावरणाचा देखील ऱ्हास होऊ लागला. मात्र गॅसदाहिनीच्या एका सिलिंडर मध्ये तीन मृतदेहांचे दहन होणार आहे. एका गॅस सिलिंडरची किंमत अडीचशे रुपये आहे. त्यामुळे पालिकेची मोठी आर्थिक बचत होणार आहे.

करोनाबळींची संख्या वाढल्याने मोठय़ा प्रमाणवर लाकडे लागत होती. त्यामुळे आर्थिक भार वाढला होता, शिवाय पर्यावरणाचे नुकसान होऊ लागले होते. या गॅसदाहिन्यांमुळे मोठी आर्थिक बचत होणार आहे. उर्वरित तीन स्मशानभूमींमध्येसुद्धा गॅसदाहिन्या बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे

-राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gas cremation started at pachu bandar cemetery in vasai ssh

ताज्या बातम्या