धान्य घेण्यासाठी वसई-विरारमध्ये नागरिकांची झुंबड, गर्दीमुळे करोना संक्रमाणाचा धोका

वसई : वसई-विरार शहरातील अनेक शिधावाटप केंद्रांवर धान्य पोहोचले नसल्याने नागरिकांना रांगा लावूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. पावसामुळे धान्याचा साठा कमी गेल्याचे पुरवठा विभागाने सांगितले आहे.

वसई-विरार शहरात १७७ शिधावाटप केंद्रे आहेत. त्यात १ लाख ३३ हजार लाभार्थ्यांना दरमहा २७ हजार क्विंटल धान्य वितरित केले जाते. त्यात नियमित शिधापत्रिकाधारकांना २ रुपये प्रति किलो दराने तांदूळ आणि ३ रुपये प्रति किलो दराने गहू वितरित केला जातो. तर अंत्योदय आणि प्राधान्य योजनेंतर्गत असलेल्या शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्यपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक शिधावाटप केंद्रावर धान्य नसल्याने ते घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. मी नालासोपारा येथील अंजली बचत गट येथील शिधावाटप केंद्रात दररोज धान्य घेण्यासाठी जातो पण तेथे लांबच लांब रागा असायच्या. सोमवारी तर धान्य संपले असा फलक लावण्यात आला आहे. मग आमच्या वाटणीचे धान्य कुठे गेले, असा सवाल येथील रहिवाशी संतोष जोशी यांनी केला आहे. धान्य खरेदीसाठी एवढी गर्दी होत असल्याने करोना संसर्गाचादेखील मोठा धोका असल्याचे त्यांनी सांगितले.

असाच प्रकार वसई-विरार शहरातील अनेक शिधावाटप केंद्रात बघायला मिळाला. धान्य घेण्यासाठी नागरिकांच्या लांब रांगा दिसत होत्या. परंतु धान्य नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत होते. पाऊस आणि वादळामुळे धान्य पोहोचू शकले नसल्याचा खुलासा पुरवठा विभागाने केला आहे. वसई-विरार शहरातील किमान १५ दुकानांत धान्याची टंचाई निर्माण झाल्याची माहिती वसईचे पुरवठा निरीक्षक रोशन कापसे यांनी दिली.

दर महिन्याला नियमित २६ हजार क्विंटल धान्य शिधावाटप केंद्रात पोहोचवले जाते. परंतु या महिन्यात पावसाचा फटका बसल्याने १५ दुकानांत ही समस्या निर्माण झाली होती. पण आता त्या दुकानात आम्ही धान्य पाठविण्याची व्यवस्था केली असल्याचे त्यांनी सांगितले.