वसई-विरार शहरातील तक्रारींचा खासदारांच्या बैठकीत आढावा

वसई : वसई-विरार शहरातील विविध ठिकाणी पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पालिकेकडून पाणी समस्या सोडविण्यासाठी हलगर्जीपणा केला जात असल्याचा आरोप उपस्थित असलेल्या नागरिकांनी खासदारांच्या आढावा बैठकीत केला.

वसई-विरार शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. पालिकेकडून पाण्याचे योग्य नियोजन केले जात नाही त्यामुळे अनेक ठिकाणच्या नागरिकांना अजूनही मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही. यासाठी सोमवारी संध्याकाळी पालिकेच्या मुख्यालयात पालिकेचे अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्ष कार्यकर्ते यांची एकत्रित आढावा बैठक घेण्यात आली.

नायगाव पूर्वेच्या भागात परेरा नगर, गणेश नगर अशा विविध ठिकाणच्या भागात दोन ते तीन दिवसांनी पाणी येते. तेही कमी प्रमाणात मिळत असल्याची तक्रार मंगेश चव्हाण यांनी केली. तसेच प्रभाग क्रमांक ८२, ८३, ८६ या भागांतही पाण्याची अशीच परिस्थिती आहे. वसंत नगरी येथील भागांतही ठरावीक इमारतींना पाणीपुरवठा केला जातो. तर काही ‘वॉल्व्हमन’  हे पाणी सोडण्यासाठी इमारतीकडून पैसे घेतात. जे पैसे देतात त्यांनाच मुबलक पाणी दिले जात असल्याचा आरोप अनिल चव्हाण यांनी यावेळी केला आहे. मोरेगाव भागातील पाण्याची टाकी भरण्यास विलंब होत असून त्याचे योग्यरित्या वितरण होत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना अडचणी येत आहेत असे माजी नगरसेवक किशोर पाटील यांनी सांगितले. वसईच्या कामण चिंचोटी यासह इतर गाव-पाडय़ांत अजूनही पालिकेकडून पाणीच पोहचले नाही. त्यामुळे आजही येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे यांनी सांगितले.

नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते याचे मुख्य कारण पालिकेची वितरण व्यवस्था ही सदोष आहे. तसेच अनधिकृत नळजोडण्यांची तपासणी करावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रवीण म्हाप्रलकर यांनी केली आहे. नालासोपारा पूर्वेच्या धानिव, बिलालपाडा भागांतही पाण्याच्या नागरिकांना अडचणी येत असल्याचे कल्याणी पाटील यांनी सांगितले.

वैतरणा कसराळी भागात पाण्याच्या टाक्या उभ्या असूनही नागरिकांना थेट जोडण्या देऊन पाणी दिले जाते. यामुळे वितरण व्यवस्थेत अडचणी येत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.  पाणी वितरणात सुसूत्रता येण्यासाठी मिटर लावण्यात यावे जेणेकरून जितके पाणी तितकाच पाणी कर नागरिकांना भरावा लागेल असे भाजपचे मनोज बारोट यांनी सांगितले. दूषित पाणी नागरिकांना जाऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी त्या जलवाहिन्या बाजूला करण्यात याव्यात अशी मागणी प्रशांत खांबे यांनी केली.

ज्या ज्या भागात पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या ठिकाणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे प्रश्न सोडवावेत तसेच पाण्याच्या वितरणाच्या संदर्भात त्याचे लेखापरीक्षण करावे जेणेकरून पालिकेला ही त्याचे योग्य नियोजन करून पाणी नागरिकांपर्यंत पोहचविणे शक्य होईल अशा सूचना खा.राजेंद्र गावित यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न

वसई-विरार शहरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरूच असतात. विविध भागातील नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत. त्यानुसार त्याठिकाणी उपाययोजना करण्यात येतील असे पालिकेचे आयुक्त गंगाथरन डी यांनी सांगितले. ज्या ठिकाणी अनधिकृत नळजोडण्या व चोरीचे पाणी वापरले जात असेल याची पाहणी केली जाईल तसेच नागरिकांच्या काही निदर्शनास आले तर त्याची माहिती पालिकेला द्या. त्यांच्यावर पालिकेकडून कारवाई केली जाईल, असे पालिकेच्या आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. पाण्याच्या संदर्भात ज्या त्रुटी आहेत त्याचे लेखा परीक्षण करण्यासाठी पालिकेने पथक नेमले आहे. त्यासाठी एक ते सव्वा महिना इतका कालावधी लागेल, असे पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी सांगितले.