सौम्य लक्षणे असणाऱ्या करोना रुग्णांच्या गृहविलगीकरणासाठी म्हाडा येथे २०० सदनिका

वसई : वसई विरार शहरात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावले उचलली जात आहेत. करोना रुग्णालयापाठोपाठ आता गृह विलगीकरणासाठी पालिकेने विरारच्या म्हाडा येथील २०० सदनिका ताब्यात घेतल्या आहेत. त्यात सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे विलगीकरण केले जाणार आहे.

मागील काही दिवसांपासून वसई विरार शहरात करोनाचा प्रसार हा वेगाने होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसाला सरासरी ६०० ते ७०० इतके करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढू लागली आहे. करोना नियंत्रित करण्यासाठी विविध स्तरावर पालिकेकडून उपाय योजना करण्यावर भर दिला जात आहे. वसई विरार शहराच्या पूर्वेच्या भागात मोठय़ा प्रमाणात बैठय़ा चाळी उभ्या राहिल्या आहेत.त्यात मोठय़ा संख्येने नागरिक हे दाटीवाटीने राहत आहेत. अशा ठिकाणीही करोनाबाधित रुग्ण आढळून येतात. परंतु सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना गृहविलगीकरणात राहूनही उपचार घेऊ शकतात. असे जरी असले तरी गृहविलगीकरण करण्यासाठी काही जणांच्या घरी स्वतंत्र खोलीची सुविधा नसते. अशामुळे याचा संसर्गाचा प्रसार अधिकच वाढण्याची भीती असते. अशा रुग्णांना गृहवीलगीकरणाची सुविधा मिळावी यासाठी  पालिकेने विरार पश्चिमेच्या म्हाडा येथे इमारत क्रमांक १० मधील २०० सदनिका म्हाडाच्या सहकार्याने ताब्यात घेऊन गृहवीलगीकरणासाठी अद्ययावत करण्यात येत आहेत. त्यात जवळपास ६०० रुग्ण गृहविलगीकरणात राहू शकतात इतकी क्षमता आहे असे पालिकेकडून देण्यात आली आहे. ज्यांच्याकडे गृह विलगीकरणाची सुविधा नाही अशा रुग्णांना या सुविधेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांनी सांगितले आहे.

करोनाबाधित रुग्णांना १७०० खाटांची सुविधा

वसई विरार शहरात करोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता पालिकेने करोनाची तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या उपचारांसाठी करोना रुग्णालये पुन्हा अद्ययावत करण्यात आली आहे. यात वरूण इंडस्ट्रीमध्ये १२०० खाटा , चंदनसार रुग्णालयात १५०, बोळींज रुग्णालय १५०, नालासोपारा रुग्णालय २०० अशा एकूण १ हजार ७०० खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय जे करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी ३५ रुग्णवाहिका ही कार्यरत केल्या आहेत. तसेच मागील वर्षी शहरात प्राणवायूची (ऑक्सिजन)  मोठी गरज भासली होती याच अनुषंगाने पालिकेने प्राणवायूचाही पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवला आहे जवळपास ८५ मॅट्रिक टन इतका प्राणवायू साठा उपलब्ध असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी सांगितले आहे.

करोना नियंत्रणासाठी ज्या ज्या सुविधा आवश्यक आहेत. त्या सर्व उपाययोजना पालिकेकडून करण्यात येत आहेत. सध्या सर्व काही व्यवस्था सुरळीत असून प्राणवायूचा साठाही पुरेसा उपलब्ध आहे.

– अजिंक्य बगाडे , अतिरिक्त आयुक्त वसई-विरार महापालिका