लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई : ईस्टर सणाच्या पवित्र आठवड्यातील पायधुणीचा गुरूवार वसई विरार शहरातील चर्चेस मध्ये साजरा करण्यात आला. वसईतील विविध चर्चमध्ये गुरूवारी संध्याकाळी १२ जणांचे पाय प्रातिनिधीक स्वरूपात धुण्यात आले. गुरूवार पासून पवित्र त्रिदिनाला (होली थ्रीदिम) सुरूवात झाली आहे.

राखेच्या बुधवारपासून (ॲश वेनस्डे) ख्रिस्ती बांधवांचा उपसावकाळ सुरू होतो. त्यातील ईस्टरच्या आदल्या रविवार पासून येशूच्या कालावरीच्या वाटेला प्रारंभ झाला आहे. गुरूवारी मॉंडी थर्सडे अर्थात पायधुणीचा गुरूवार साजरा करण्यात आला. त्याला आज्ञेचा गुरूवार असेही म्हटले जाते. या दिवशी मिस्सा बलिदानाची स्थापना आणि याजक (धर्मगुरू) पदाची स्थापना होते. वसई धर्मप्रांतात ४४ चर्चेस आहेत. गुरूवारी संध्याकाळी प्रत्येक धर्मग्रामात (पॅरीश) सेवेचे प्रतिक १२ जणांचे पाय प्रातिनिधित स्वरूपात धुण्यात आले. त्यात लहान मुले, तरुण-तरुणी, विधवा विधूर नवख्रिस्ती, दिव्यांग आणि स्त्री-पुरूष आदींचा समावेश होता.

आजपासून पवित्र त्रिदीन भक्तीला (होली थ्रीदीम) सुरू झाला आहे. आजपासून तीन दिवस चालणाऱ्या भक्तीला होली थ्रीदीम असं म्हटलं जातं. या विधीचा समारोप साक्रामेंट (पवित्र धार्मिक अनुष्ठान) च्या आराधनेपासून होतो. तेव्हापासून ख्रिस्त सभा भाविकांना मौन पाळण्याचे विनंती करते. या काळात चर्चचा घंटानाद देखील बंद केला जातो, अशी माहिती नंदाखाल चर्चेचे सहाय्यक धर्मगुरू फादर निलेश तुस्कानो यांनी दिली.

आज गुड फ्रायडे

शुभ शुक्रवार अर्थात गुड फ्रायडेच्या सकाळी गावागावातून भाविक वर्ग चालत पवित्र ख्रिस्ताच्या भक्तीसाठी चर्चमध्ये येतात. या दिवशी येशूच्या कालावरीच्या यात्रेतील प्रवासातील १४ घटनांवर चिंतन केले जाते. सायंकाळच्या विधीमध्ये प्रभूशब्द विधी, क्रुसवंदन आणि आशिर्वादीत केलेले ख्रिस्तशरीर ग्रहण केलं जातं. गुड फ्रायडेचा दिवस ख्रिस्ती जणांसाठी अत्यंत पवित्र आणि मौल्यवान दिवस म्हणून गणला जातो. कारण येशूने मानवतेच्या कल्याणासाठी आपले प्राण वेचले. म्हणून प्रत्येक जण या दिवशी मांसाहर वर्ज्य करून पुर्ण दिवसाचा उपवास ठेवतो. मुख्य विधी संपल्यानंतर येशूचं शरीर क्रूसावरून खाली आणले जाते. आणि तिर्थयात्रेला प्रारंभ होतो. या मिरवणुकीत येशूच्या दु:खाशी एकरूप होतो. या मिरवणुकीत येशूच्या मृत शरीरावर फुलं वाहिली जातात.