|| सुहास बिऱ्हाडे

वसई: सागरी किनारपट्टीवर वाळूची जमीन, दलदलीची जागा आणि कच्चे रस्ते यामुळे पोलिसांना गस्त घालणे शक्य होत नव्हते. परिणामी, अनेक गैरप्रकारांना ऊत आला होता. याशिवाय सागरी किनारपट्टीलाही धोका निर्माण झाला होता. अशा किनारपट्टीवर गस्त घालण्यासाठी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चक्क घोड्यावरून गस्त घालायला सुरुवात केली आहे. घोड्यावरचा पोलीस हा सध्या अर्नाळा परिसरात आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.

वसई पश्चिमेला मोठी सागरी किनारपट्टी लाभली आहे. या भागातील अर्नाळा, नवापूर, भुईगाव, कळंब, राजोडी, रानगाव, सुरूची बाग या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात, परंतु त्याचवेळी किनारपट्टीवर अनेक गैरप्रकारदेखील होत असतात. वाळू माफियांकडून वाळूची चोरी, सुरूच्या झाडांची कत्तल होत असते. सागरी किनारपट्टीवर अनेक दुर्घटनादेखील घडत असतात. पर्यंटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो. अनेक जण आत्महत्या करण्यासाठी येत असतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून समाजविघातक प्रवृत्तींवरही लक्ष ठेवणे आवश्यक असते. अशा वेळी सागरी किनारपट्टीवर नियमित गस्त घालणे गरजेचे असते, परंतु किनारपट्टीची वाळूची जमीन, दलदलीचा रस्ता यामुळे वाहने नेण्यासाठी अडचण निर्माण व्हायची. परिणामी, पोलिसांना गस्त घालणे शक्य होत नव्हते. यावर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी अनोखा तोडगा काढला  आहे. त्यांनी किनारपट्टीवर चक्क घोड्यावरून गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.

घोड्यावरून गस्त घालण्याचा दुहेरी फायदा होत असल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले. मोटारसायकल किंवा चारचाकी वाहन पूर्वी नेता येत नव्हते. पण घोडा असल्याने किनारपट्टीच्या कुठल्याही भागात सहज जाता येते. त्याचा आवाज होत नसल्याने अनेक गैरप्रकार करणाऱ्यांना रंगेहाथ पकडल्याचेही त्यांनी सांगितले. या गस्तीमुळे शारीरिक तंदुरुस्तीही राखता येते. टाळेबंदीच्या काळापासून त्यांनी हा प्रयोग सुरू केला. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याची हद्द ही १० किलोमीटर सागरी किनारपट्टीची आहे. त्या ठिकाणी ते दररोज घोड्यावरून रपेट मारून गस्त घालत असतात.

खास घोडा शिकण्याचे घेतले प्रशिक्षण

किनारपट्टीवर गस्त घालणे गरजेचे होते. पण वाहनांनी ते शक्य नव्हते. किनारपट्टीवर पर्यटकांना फिरविण्यासाठी घोडेस्वार यायचे. मग याच घोड्यावरून रपेट मारली तर गस्त घालणे सोप्पं जाईल, असा विचार पाटील यांनी केला. त्यासाठी त्यांनी घोडेस्वाराकडून महिन्याभराचे प्रशिक्षण घेतले आणि गस्त सुरू केली. त्यामुळे या भागात अमर पाटील यांची ‘घोडेवाला पोलीस’ अशी ओळख बनली आहे. ते पोलीस गणवेशात गस्त घालायला निघाले की लोकही कुतूहलाने त्यांना बघत फोटो घेत असतात. घोडे याच भागातील घोडेस्वारांचे असल्याने घोडे सांभाळण्याचा खर्चही पोलिसांना येत नाही.