वसई / भाईंदर: महाराष्ट्र शासनाने मद्यावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट), उत्पादन शुल्क आणि परवाना शुल्कात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ सोमवारी वसई तालुका हॉटेल असोसिएशनच्या वतीने एकदिवसीय संप पुकारण्यात आला. या संपात वसई-विरार भागातील ३१२ हॉटेल, बारचालक तसेच परमिट रूम चालक सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्रभरात सरकारच्या करवाढीविरोधात हॉटेल आणि बारचालकांकडून संप पुकारण्यात आला आहे. या संपात महाराष्ट्रातील सुमारे २० हजार बारचालक, तसेच वसई-विरार भागातील ३१२ हॉटेल, बार आणि परमिट रूम चालकांचा समावेश आहे. वसई तालुका हॉटेल असोसिएशनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या एकदिवसीय संपामुळे आज शहरातील सर्व बार, परमिट रूम आणि हॉटेलमधील मद्यसेवा पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.
सरकारने एका वर्षाच्या कालावधीत मद्यावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) ५ टक्क्यांवरून थेट १० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यानंतर परवाना शुल्कात १५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली, तसेच उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. यामुळे बार आणि परमिट रूम चालकांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. त्याचबरोबर अजूनही अनेक ब्रिटिशकालीन कायदे या व्यवसायावर लागू होत असून, ते अद्ययावत करण्याची गरज आहे, अशी मागणी वसई तालुका हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष प्रीतम सिंह गोहोनिया यांनी केली. “सरकारने यावर तोडगा काढला नाही, तर आम्हाला बेमुदत संप पुकारावा लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारच्या सततच्या करवाढीमुळे परमिट रूम व बारमधील दारू विक्री महागली आहे. त्यामुळे नागरिकांचा ओढा शहरातील अवैध बार किंवा दारू दुकानांकडे वाढत आहे. “परवाना शुल्कावरील ही अवास्तव वाढ सरकारने कमी करावी,” अशी मागणी वसई तालुका हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष भरत शेट्टी यांनी केली.
कामगारांवर बेरोजगारीचे संकट
सरकारने वाढवलेले परवाना शुल्क, उत्पादन शुल्क आणि मूल्यवर्धित कर यामुळे बार आणि परमिट रूम चालकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली असून, यामुळे कामगारांवरही बेरोजगारीचे संकट येऊ शकते. त्यामुळे सरकारने हे कर नियंत्रित करावेत, अशी मागणी बार आणि परमिट रूममधील कामगारांकडूनही केली जात आहे.
मिरा भाईंदर मध्ये बंद
मद्यविक्रीवरील वाढत्या जाचक करवाढीच्या निषेधार्थ मिरा-भाईंदरमधील हॉटेल चालकांनी सोमवारी एक दिवसीय बंद आंदोलन केले.हॉटेल व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होते, तसेच पर्यटन आणि लघुउद्योगांना चालना मिळते. त्यामुळे सरकारने या व्यवसायाच्या बाजूने विचार करून धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी हॉटेल व्यवसायिकांनी केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदरचे हॉटेल व्यावसायिक संतोष पुत्रण यांनी समाजमाध्यमांद्वारे माहिती देत सांगितले की, “राज्य सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचावा म्हणून आम्ही एक दिवसीय कामबंद आंदोलन करत आहोत.”