विरार ‘आयसीआयसीआय’ बँक दरोडा प्रकरण

वसई : विरारमधील आयसीआयसीआय बँक लुटण्याचा प्रयत्न करणारा आरोपी अनिल दुबे याला ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुबे याच्यावर १ कोटी रुपयांचे कर्ज असल्याने कर्ज फेडण्यासाठी त्याने हा कट आखल्याचे तपासात समोर आले. या हल्ल्यात बँकेच्या व्यवस्थापिका योगिता वर्तक-चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर रोखपाल श्रद्धा देवरुखकर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर विरारच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

विरार पूर्व येथील आयसीआयसीआय बँकेचा माजी व्यवस्थापक असलेला आरोपी अनिल दुबे याने गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास बँकेत शिरून दोन महिला कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला होता. या वेळी त्याने बँकेच्या लॉकरमधील सव्वादोन कोटी रुपयांचा सोने आणि रोख रक्कम असा ऐवज लुटून नेला होता. मात्र स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे तो पकडला गेला. त्याने केलेल्या हल्ल्यात योगिता चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर श्रद्धा देवरुखकर या जखमी झाल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी दुबे याचे शेअर बाजारात ५० लाख रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच त्याने वैयक्तिक कर्जे घेतली होती. त्याच्यावर एकूण १ कोटीचे कर्ज झाले होते. त्यामुळे त्याने बँक लुटण्याची योजना आखली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.