भाईंदर : करोनाचे संकट डोक्यावर असताना स्वच्छतेसारख्या मूलभूत गोष्टींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यात इमारतीमधील सुक्या व ओल्या कचऱ्याचे वर्गीकरणदेखील थंडावले असल्यामुळे सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात लगबग १० हजारांहून अधिक सदनिका आणि अनेक गावे आहेत. त्यामुळे शहराचे योग्य व्यवस्थापन होण्याकरिता महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्वरूपांच्या उपाययोजना आखण्यात येतात. यात सांडपाणी प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन आणि भूमिगत गटार योजनेचा समावेश आहे. सध्या देशात ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू असल्यामुळे पालिका प्रशासनाकडून शहर स्वच्छतेकडे अधिक भर देण्यात येत आहे. याकरिता नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आवश्यक असलेले कचऱ्याचे डबेदेखील पुरवण्यात आले आहे. मात्र असे असतानादेखील ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्यामुळे त्याचा परिणाम घनकचरा प्रकल्पावर होत आहे.
शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण होऊन शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता प्रशासनाकडून अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच कचऱ्याची वाहतूक करण्याकरिता अत्याधुनिक गाडय़ा उपलब्ध करून दररोज त्याद्वारे कचरा उचलण्यात येतो. मात्र अनेक सदनिकेतील रहिवासी कचऱ्याचे वर्गीकरण करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा सोसायटय़ांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच या नियमांचे योग्यपणे पालन व्हावे म्हणून ७ हजारांहून अधिक इमारतींना नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून सांगण्यात आली असली तरी प्रत्यक्षात स्वच्छते कडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करत आहेत.
ज्या ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण होत नाही त्याची माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
– संभाजी पानपट्टे, उपायुक्त (आरोग्य विभाग)