वसई: आरती यादव हत्याकांडात एक नवीन खुलासा समोर आला आहे. आरोपी रोहितचं आडनाव यादव नसून पाल आहे. तसेच तो हरियाणाचा रहिवासी नसून उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे.  त्याचे आई-वडील देखील जिवंत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, रोहित याला सोमवारी वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

मंगळवारी वसईच्या गावराई पाडा येथे आरती यादव या तरुणीची तिचा प्रियकर रोहित याने डोक्यात लोखंडी पाना घालून हत्या केली होती. पोलीस कोठडीत असलेल्या रोहितला सोमवारी वसईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे त्याला चार दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

हेही वाचा >>>वसई: महामार्गालगतच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेची सुट्टीच्या दिवशी कारवाई, ५० हजार चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त

रोहित ‘यादव’ नव्हे तर ‘पाल’

पोलीस कोठडीत असलेल्या रोहितने पोलिसांची दिशाभूल  केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने आपले नाव रोहित यादव असल्याचे पोलिसांना सांगितले होते. माझे मूळ गाव हरियाणा मधील असून मी अनाथ आहे. मला आई वडील तसेच भाऊ-बहीण नाही अशी माहिती त्यांने पोलिसांना दिली होती. मात्र तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी रोहित यादव याचे खरे नाव रोहित पाल आहे. तसेच त्याचे आई-वडील देखील हयात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पुढील दोन दिवसात त्याच्या आई-वडिलांच्या हयात असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त केली जाईल. उत्तर प्रदेशातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आम्ही त्याची पडताळणी करत आहोत अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांनी दिली.

रोहितने रागाच्या भरात आरतीची हत्या केल्याचा दावा त्याचे वकील ऍड हरीश गौर यांनी केला आहे. मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. हत्येच्या एक आठवड्याआधीच त्याने लोखंडी पाना आणला होता असे पोलिसांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.