महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे वाद
भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेत नव्याने करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांमुळे नव्या वादास सुरुवात झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीन महिन्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांची बदली केली असताना त्यांना पुन्हा त्याच पदावर आणण्यात आल्यामुळे संपूर्ण बदली प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात येत आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप वाढत असल्यामुळे तीन महिन्यांपूर्वी तत्कालीन पालिका आयुक्त आयएएस विजय राठोड यांनी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पालिकेच्या कामकाजात पारदर्शकता निर्माण होऊन काम योग्य पद्धतीने होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. मात्र यानंतर महिन्याभरात आयुक्त विजय राठोड यांची बदली होऊन दिलीप ढोले यांची पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार पालिकेचे कामकाज सुरू असताना सोमवारी पुन्हा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश आयुक्त दिलीप ढोले यांनी काढले.
यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पदावर असणाऱ्या सुरेश वाकडे यांची पुन्हा पाणीपुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे. तर पाणीपुरवठा विभागात कार्यकारी अभियंता पदावर असणाऱ्या दीपक खांबित यांची सार्वजनिक बांधकाम विभागात बदली करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे अनेक वर्षांपासून एकाच विभागात असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे पुन्हा त्याच विभागांची जबाबदारी देण्यात आल्याने आयुक्तांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याचप्रमाणे मनपा उपायुक्त अजित मुठे यांच्याकडील अतिक्रमण विभागाची उपायुक्त मारुती गायकवाड व परिवहन विभागाची उपायुक्त संभाजी पानपट्टे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तर पानपट्टी यांच्याकडे असणारे सार्वजनिक आरोग्य विभाग मुठे यांच्याकडे देण्यात आले आहे.