वसई: सिनेमात लोकांना फसवून गंडा घालणारी ‘बंटी-बबली’ नावाची जोडगोळी चांगलीच प्रसिध्द झाली होती. वसईतही अशाच एका जोडगोळीने एका प्रख्यात ज्वेलर्सच्या दुकानात अनोख्या पध्दतीने चोरी केली आहे. यातील तरुणीने चोरी करण्यासाठी दुकानात आधी सेल्सगर्लची नोकरी मिळवली आणि नंतर तिचा मित्र ग्राहक बनून दुकानात आला आणि पावणेदोन लाखांची सोनसाखळी लंपास केली. या ‘बंटी-बबली’ ची जोडी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वसईत अनोखी चोरी करणार्या या बंटी बबलीचे नाव आहे अमृता सकपाळ (२६) आणि विनोद मर्चंडे.
ज्वेलर्स दुकानात कडेकोट बंदोबस्त असतो. त्यामुळे तेथे चोरी करणे कठीण असते. यासाठी या दोघांनी एक अनोखी योजना बनवली. योजनेनुसार अमृता सकपाळ (२६) हीने नायगाव येथील तनिष्क या प्रसिद्ध ज्वेलर्स दुकानात सेल्सगर्लची नोकरी मिळवली. ग्राहकांना दागिने दाखवण्याचे काम होते. या दुकानात एकूण ५३ जणांचा स्टाफ आहे. अमृताने दोन महिन्यांत सर्व कामाची पध्दत, बारकावे हेरून ठेवले. ठरलेल्या योजनेनुसार तिचा मित्र विनोद मर्चंडे दुकानात ग्राहक बनून आला. त्याने आपल्या गळ्यातील एक सोनसाखळी दाखवून अशीच चेन हवी असे सांगितले. त्यानुसार अमृता त्याला दुकानातील वेगवेगळ्या सोनसाखळी दाखवू लागली. दरम्यान, विनोदने आपल्या गळ्यातील नकली सोनसाखळी काढून सोन्याची असली सोनसाखळी गळ्यात घातली. मला दागिने पसंद पडले नाही, असे सांगून आरामात निघून गेला..या दोघांनी मिळून तब्बल १ लाख ७५ हजारांची सोनसाखळी सहज लंपास केली.
हेही वाचा : महावीर जयंती निमित्त चिकन, मटण दुकाने बंद ठेवण्याचे आदेश; पालिकेच्या निर्णयाविरोधात वसईकरांचा संताप
अशी झाली चोरी उघड…
अमृता आणि विनोदची योजना यशस्वी झाली होती. कुणाला संशय येणार नाही असे त्यांना वाटले. मात्र काही दिवसांनी दुकानात आलेल्या एका ग्राहकाने एक सोनसाखली पसंद केली होती. ती ग्राहकाला देण्यापूर्वी तपासणीमध्ये त्यावर हॉलमार्क नसल्याचे आढळले. तपासणीत ती नकली असल्याचे समजले आणि एकच खळबळ उडाली. नकली सोनसाखळी दुकानात आलीच कशी असा प्रश्न पडला आणि धावपळ सुरू झाली. अखेर सीसीटीव्ही मध्ये ११ एप्रिल २०२४ रोजी हा प्रकार दिसून आला. मात्र तो पर्यंत अमृताही काम सोडून पसार झाली होती.
हेही वाचा : वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
या प्रकऱणी तनिष्क ज्वेलर्सचे व्यवस्थापक नितीन मौर्य यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून माणिकपूर पोलिसांनी अमृता सकपाळ आणि विनोद मर्चंडे या दोघांविरोधात कलम ३८१, ३४ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे मालाडच्या अप्पापाडा परिसरात राहणारे आहेत. दोघांनी संगनमत करून चोरीची योजना बनवली होती. आम्ही त्यांना लवकरच अटक करू असे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितले.