वसई- विरारमधील कॅनरा बॅंकेच्या एटीएममधील सुरक्षेसाठी असलेला अलार्म गुरुवारी सकाळी अचानक वाजल्याने एकच गोंधळ उडाला. तब्बल ५ तास हा अलार्म सुरू असल्याने स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागला. इतका वेळ अलार्म सुरू असूनही बॅंक तसेच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी करण्याचे सौजन्य दाखवले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

विरार पूर्वेतील फुलपाडा परिसरातील गांधी चौकात असलेल्या रामचंद्र अपार्टमेंटमध्ये कॅनरा बॅंकेचे एटीएम आहे. या एटीएम केंद्राबाहेर सुरक्षा रक्षक नाही. गुरुवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास अचानकपणे एटीएम केंद्रातील धोक्याची सुचना देणारा अलार्म अचानक वाजू लागला. यामुळे परिसरात एकच घबराट उडाली होती. सुरवातीला अलार्म वाजल्यावर एटीएम केंद्रात काही अघटीत घडल्याची शक्यता स्थानिकांना वाटली. त्यामुळे स्थानिक नागरिक धास्तावले होेते. पंरतु हा अलार्म सतत वाजत होता. तो बंद न झाल्यामुळे त्याच्या कर्कश आवाजाने नागरिकांची झोप मोड झाली. हा अलार्म मध्यरात्री ३ ते सकाळी १० पर्यंत सलग ५ तास वाजत होता. तो का वाजतो? नेमंक काय झालं? ते बघण्यासाठी कुणी आलं नाही. स्थानिकांनी पोलिसांनाही याबाबत माहिती दिली. परंतु पोलीसही घटनास्थळी आले नाही अशी तक्रार स्थानिकांनी केली. सतत ५ तास वाजणार्‍या या अलार्ममुळे स्थानिकांना खूप त्रास सहन कराव लागला. असे प्रकार अधून मधून वारंवार होत असतात. त्याच्या आवाजाचा आम्हाला त्रास सहन करावा लागतो असे स्थानिकांनी सांगितले. बँकेने अलार्मचा तांत्रिक दोष दुरुस्त करून, आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

हेही वाचा – वसई, मिरा रोडमध्ये ७ कोटी ८० लाखांची रोकड जप्त, एटीएम व्हॅनमध्ये संशयास्पद बेकायदेशीर रोकड

हेही वाचा – आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

पोलिसांनी मात्र अशा प्रकारच्या घटनेची नोंद नसल्याचे सांगितले. आमच्याकडे बॅंकेकडून कुठल्याही प्रकारची तक्रार आली नाही, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवलकर यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या एटीएम केंद्रात सुरक्षा रक्षक नसतो तेथे सुरक्षेसाठी स्वयंचलित अलार्म लावण्यात आलेला असतो. एटीएम केंद्रात दोनपेक्षा जास्त ग्राहक शिरले तर सेन्सरमुळे हा अलार्म वाजतो. गुरुवारी इतका वेळ अलार्म का वाजत होता, त्याची माहिती बॅंकेच्या स्थानिक शाखेकडून घेतली जाईल असे कॅनरा बॅंकच्या उत्तर विभागाचे व्यवस्थापक अभिलाष मिश्रा यांनी सांगितले.