वसई : वसईच्या सुरुची समुद्रकिनाऱ्यावर बुडणाऱ्या दोन तरुणींचे प्राण वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले आहे. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. हृतिका यादव (१७), करिश्मा यादव (१७) असे प्राण वाचविण्यात आलेल्या तरुणींची नावे आहेत. वसई पश्चिमेच्या भागात सुरुची समुद्रकिनारा आहे. सध्या नाताळचा सण व नववर्ष या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येऊ लागले आहेत.

बुधवारी पेल्हार नालासोपारा या भागातील पाच ते सहा तरुणींचा गट दुपारच्या सुमारास फिरण्यासाठी आला होता. मौज मजा करत असताना त्यातील दोन जणी समुद्रात गेल्या होत्या. याचवेळी त्या दोघींचे पाय जाळ्यात अडकल्याने त्या बुडत होत्या. हीच घटना समुद्रकिनारी उपस्थित असलेले मंदार तांडेल व जयेश तांडेल या जीवरक्षकांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणींना सुखरूप बाहेर काढले व रिक्षात बसवून तातडीने वसईच्या ‘सर डीएम पेटिट रुग्णालया’त उपचारासाठी दाखल केले.

हेही वाचा : वसईतील बेकायदेशीर लॅब प्रकरण : डॉ. राजेश सोनी याची वैद्यक परिषदेकडे नोंदणी नसल्याचे स्पष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही वॉच टॉवरवर उभे होतो. याचवेळी त्या ठिकाणाहून आरडा ओरडा ऐकू आला. तेव्हा आम्ही घटनास्थळी धाव घेत त्या तरुणींना बाहेर काढले, असे जीव रक्षक मंदार तांडेल यांनी सांगितले आहे. वेळेवर उपचार झाल्याने दोन्ही तरुणी सुखरूप आहेत. जीव रक्षकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे तरुणींचे प्राण वाचले असून दोन्ही जीवरक्षकांचे कौतुक होत आहे.