वसई :- वसई विरार शहरात बेकायदेशीर ताडी माडी विक्री केंद्राचा सुळसुळाट झाला असून त्यातून भेसळयुक्त ताडी माडीची विक्री करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे.
वसई विरार शहरात परवानाधारक ताडी माडी विक्रेत्यांची संख्या ३५ ते ४० इतकी आहे. मात्र या व्यतिरिक्त ५० ते ६० ताडी माडी विक्री केंद्र राजरोसपणे सुरू आहेत. वसईत माडाची झाडांची संख्या मर्यादीत आहेत. त्यातून ताडी माडी निघण्याचे प्रमाण कमी आहे. तरी देखील वसई विरार शहरात १०० हून अधिक ताडी माडी विक्रीची दुकाने आहे. नैसर्गिक ताडी असल्याचा दावा करून या दुकानातून ताडी माडीची विक्री केली जात असते. या दुकानातून दररोज हजारो लिटर ताडी माडी विकली जाते.
ऑगस्ट महिन्यात परवान्यांची मुदत संपली तरी ही ताडी माडी विक्रीची दुकाने राजरोस सुरू आहेत. पावसाळ्यात ताडी निघत नसतानांही या दुकानातून ताडी माडीची विक्री केली जात होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि दलालांच्या संगनमताने ही दुकाने सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
तपासणी पथकांची दिशाभूल
बोरीवलीच्या आमदार मनिषा चौधरी यांनी अधिवेशनात अशा बेकायदेशीर ताडीमाडी विक्री दुकानांबाबत प्रश्न उपस्थित करून आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर तपासणीसाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती. मात्र मुंबईवरून ही पथके कारवाईला येताच त्याची माहिती विक्रेत्यांना पुरवली जाते आणि ही केंद्रे बंद ठेवण्यात येतात. त्यामुळे कारवाई करता येत नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक कार्यालयाकडून थातूर मातूर करवाई करण्यात येत असते.
अशी केली जाते भेसळ..
नैसर्गिक ताडी मध्ये क्लोराल हायड्रेट नावाचे रसायन मिसळून ही ताडी तयार केली जाते. २ लिटर ताडी मध्ये त्यात रसायनमिश्रीत पाणी टाकून ३२ लिटर ताडी तयार केली जाते. ही ताडी नैसर्गिक म्हणून गोरगरीबांना विकली जाते. या ताडीमाडीचे सेवन केल्यामुळे लगेच खूप जास्त प्रमाणात नशा आणि गुंगी येते. त्याचा परिणाम सेंट्रल नव्हर्स सिस्टीमवर होतो. त्यानंतर कुणी अल्कोहोलचे सेवन केल्यास रक्तदाब वाढून हृदयविकाराचा धोका संभवतो. अशी भेसळयुक्त ताडी आरोग्याला अत्यंत धोकादायक असते.
ताडी माडी केंद्रावर आम्ही सातत्याने कारवाई करत असतो. ज्या केंद्रात भेसळ होत असेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नालासोपारा विभागाचे निरीक्षक संजय सराफ यांनी सांगितले.