पत्रिकाधारकांची वाढती संख्या पाहता गैरसोय टाळण्यासाठी पाऊल

वसई: वसई विरार शहरात शिधापत्रिकाधारकांची वाढती संख्या व त्यासोबतच नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पुरवठा विभागाकडून आणखीन दोन नवीन शिधावाटप केंद्र तयार करण्यात येणार आहे. ही केंद्रे नायगाव पूर्वेतील परेरा नगर व विरार येथील चिखल डोंगरी येथे होणार आहेत.

अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचे वितरण केले जाते. वसईत यासाठी शिधावाटप केंद्र उभारण्यात आली आहेत. परंतु या शिधावाटप केंद्रावर अनेकदा गर्दी असते. तर काही ठिकाणच्या नागरिकांना शिधावाटप केंद्र दूरच्या अंतरावर असल्याने धान्य घेण्यासाठी ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत असतात. यात त्यांचा वेळ व प्रवासभाडे असे दोन्ही वाया जाते.

वसईत सध्या १७७ इतकी शिधावाटप केंद्रे आहेत. त्यात अंत्योदय शिधापत्रिका ३ हजार ७१९, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक १ लाख २७ हजार ६६६,एपीएल शिधापत्रिका धारक  १ लाख ८७ हजार ८७५शुभ्र शिधापत्रिका २० हजार २४६ , असे एकूण ३ लाख ३९ हजार ५०६ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यातच शहराचे झपाटय़ाने नागरीकरण झपाटय़ाने वाढू लागले आहे. त्यामुळे अनेकजण कामानिमित्त वैगरे स्थलांतरित होऊन वसईत राहत आहेत. त्यामुळे त्याठिकाणचे शिधापत्रिकेची नोंद ही या ठिकाणी केली जात आहे. त्यामुळे हळूहळू शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांंची संख्या ही वाढत आहे.

याच अनुषंगाने शिधावाटप केंद्रात वाढ होणे गरजेचे आहे. जेणेकरून शिधापत्रिका धारकांची होणारी गैरसोय टाळता येईल. यासाठी  परेरानगर व विरार येथील चिखलडोंगरी नवीन दोन शिधावाटप केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून ती केंद्र सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती  वसई तालुका पुरवठा अधिकारी रोशन कापसे यांनी सांगितले आहे. दोन ने या केंद्रात वाढ होणार असल्याने वसईतील एकूण केंद्राची संख्या १७७ वरून १७९ इतकी होणार आहे.

परेरानगर व विरार येथील चिखलडोंगरी येथे नवीन शिधावाटप केंद्र सुरू होणार आहे. त्यासाठीची शिधापत्रिका पीओएस यंत्रणेत नोंद करणे, विभक्त करणे अशी कामे सुरू असून ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर केंद्रे सुरू होतील.

— रोशन कापसे, पुरवठा अधिकारी वसई