मिठाईच्या दरात ३५ टक्क्यांनी वाढ, सुक्या मेव्याच्या आयातीत घट
विरार : गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मिठाईची मागणी असते. यामुळे वेगवेगळ्या चवीच्या, सुकामेव्याच्या मिठाई बाजारात येतात. पण यावर्षी अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहता सुक्यामेव्याची आयात मंदावली असल्याने यावर्षी मिठाईचा गोडवा कमी झाला आहे. मिठाईच्या किमती वाढल्याने नवसालाही महागाईचे विघ्न आले आहे. यावर्षी मिठाईच्या दरात ३० ते ३५ टक्क्यांची वाढ पहायला मिळत आहे.
करोना वैश्विाक महामारीच्या प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी सणांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. पण त्यात नागरिकांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. नुकतेच खाद्यतेल, घरगुती इंधन वायू आणि पेट्रोल, डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. याचा परिमाण मिठाईसाठी लागणाऱ्या अनेक जिन्नसवर झाला आहे. मागील वर्षीच्या तुलेनेने सर्वच साहित्य २० ते २५ टक्क्यांनी वधारले आहे. यावर्षी गणपतीला नैवैद्य दाखवताना विशेष करून वापरली जाणारी मिठाई महागल्याने नागरिकांचा उत्सवरचा खर्च वाढला आहे. करोनामुळे अजूनही आर्थिक गाडी रुळावर आली नसल्याने आणि त्यात महागाई यामुळे सणाला परवानगी मिळाली तरी आर्थिक कोंडी वाढली आहे.
अफगाणिस्तानमधील राजकीय उलाढाल यामुळे स्थिती बदल्याने अफगाणिस्तानातून भारतात येणारे मनुके, अक्रोड, बदाम, अंजीर, पाइन नट, पिस्ता, सुक्या जर्दाळू त्याचसोबत डाळिंब, सफरचंद, चेरी, खरबूज, टरबूज तसंच हिंग, जिरे यांसारखे मसाले तसंच केसर यांची आयात मंदावल्याने याचा परिमाण भारतीय बाजारपेठांवर जाणवू लागला आहे. मिठाईसाठी सुक्यामेव्याचा अधिक वापर केला जातो. त्याचबरोबर ग्राहकांकडून सुका मेव्याच्या मिठाईची मागणी सर्वाधिक केली जाते. शहरातील मिठाईच्या दुकानात अंजीर, अक्रोड, बदाम, पाईन, पिस्ता, काजू, मनुके, इत्यादीचा वापर करून अनेक मिठाई बाजारात आल्या आहेत. चॉकलेट, स्ट्रोबेरी, आंबा, गुलाब, केसर मावा, कडक बुंदीचे लाडू, राजावाडी, बंगाली मिठाई आली आहेत. अनेक महिला बचत गटांनी उकडीचे मोदकाची मागणी नोंदवून घेतल्या आहेत.
मिठाईचे दर प्रती किलो
मलाई पेढे – ४५० ते ५००
वेगवेगळ्या फेल्वर च्या मिठाई -७०० ते १४००
ड्रायफ्रुट अंजीर मिठाई – १२०० ते १४००
मावा बर्फी – ६०० ते ७५०
केसर मावा बर्फी – ७०० ते ८५० रुपये
काजू कतरी -१२०० ते १४०० रुपये
स्ट्रोबेरी मिठाई – १२०० ते १३०० रुपये
गुलाब (रोज) फ्लेवर मिठाई झ्र १२०० ते १३०० रुपये
चॉकलेट फ्लेवर मिठाई – ७०० ते ८०० रुपये
कडक बुंदीचे लाडू लहान -१५०, मध्यम- २५०, मोठा ५०० नग