वसई : बलात्कारपीडित महिलांच्या तपासणीसाठी अखेर वसई-विरार महापालिकेने दोन रुग्णालयात तपासणी केंद्र सुरू केले आहे. यामुळे शहरातील बलात्कारपीडितांना मुंबईला नेण्याची गरज भासणार नाही. असे तपासणी केंद्र शहरात नसल्याने बलात्कापीडित महिलांची मुंबईत ये-जा करताना ससेहोलपट होत होती.
बलात्कारपीडित महिलेची तक्रार आल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करावी लागते. सबळ पुराव्यासाठी सखोल तपासणीची गरज असते. मात्र वसई-विरार शहरात बलात्कारपीडित महिलांच्या तपासणीचे केंद्र नसल्याने त्यांना मुंबईच्या नायर किंवा जेजे रुग्णालयात तपासणीसाठी जावे लागते. यामुळे दोन ते तीन दिवसांचा वेळ वाया जाऊन पुरावे नष्ट होण्याचा धोका निर्माण व्हायचा तसेच महिलांची परवड व्हायची.
असे तपासणी केंद्र पालिकेने आश्वासन देऊनही सुरू न केल्याचे वृत्त लोकसत्ता वसई-विरार सहदैनिकात नुकतेच प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत पालिकेने दोन ठिकाणी हे केंद्र सुरू केले आहे. वसई पश्चिमेच्या पालिकेच्या सर डी. एम. पेटीट रुग्णालय आणि नालासोपारा पूर्वेच्या विजयनगर येथील तुळींज रुग्णालय आदी दोन ठिकाणी हे तपासणी केंद्र सुरू केल्याची माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी दिली.
या केंद्राबाबत पालिकेने पोलीस आयुक्तालयाला माहिती दिली असून तपासणी केंद्रामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे तपासणी केंद्र २४ तास सुरू राहणार असून दोन पाळ्यांमध्ये ते कार्यरत राहणार आहे. वसई-विरार महापालिकेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका किरण चेंदवणकर या काही महिन्यांपासून तपासणी केंद्रासाठी पाठपुरावा करीत होत्या.