करोना टाळेबंदीच्या काळात भुरटय़ा चोरांचा उपद्रव

विरार : करोनाकाळात वसई किल्ल्यात पर्यटकांची बंदी असल्याने सुरक्षा यंत्रणा शिथिल करण्यात आली होती. या परिस्थितीचा फायदा उचलत भुरटय़ा चोरांनी किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर डल्ला मारायला सुरुवात केली आहे. या दरवाजाचे लोखंड चोरण्याचे प्रकार समोर आले आहेत. या ऐतिहासिक दरवाजाची भग्नावस्था होत चालली आहे. याकडे पुरातत्त्व विभागाचे लक्ष नसल्याचा आरोप होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसईचा किल्ला ही वसईचा ऐतिहासिक ठेवा असून या किल्ल्यामुळे वसईच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. मागील अनेक वर्षांपासून नैसर्गिक बदलांचा मारा सातत्याने सोसत असल्याने आधीच या किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. अनेक महत्त्वाचे अवशेष नष्ट होण्याच्या मागावर आहे. किल्ल्यात सुरक्षा यंत्रणेच्या अभावी व्यसनी व भिक्षुकांचा रात्रीच्या वेळी बस्तान असते. अनेक भुरटे चोर या परिसरात फिरत असतात. परिसरात कुणी नसल्याचा फायदा घेत या किल्ल्यातील प्रवेशद्वाराचे लोखंड काढून निघून जातात.

वसईच्या किल्ल्यातील भुई दरवाजा (जमिनीकडे) असणारे प्रवेशद्वार नैसर्गिक मारा सोसत भुईसपाट होऊन नाममात्र शिल्लक राहिले आहे. यावरील लाकडी व लोखंडी फाळकी अनेक भुरटय़ा चोरांनी वाकवून लंपास केली आहेत. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने उरलेले लोखंडी प्रवेशद्वार संवर्धन व जतनीकरणाच्या हेतूने गोदामात नेऊन टाकले. सध्या करोनाकाळात वसई किल्ल्याच्या उरलेल्या सागरी दर्या दरवाजाच्या प्रवेशद्वारांच्या लोखंडी व पोलादी पट्टय़ा वाकवून तोडून लंपास करण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे या दरवाजाची लाकडे खुजून खचली असल्याने त्याचे लोखंड काढणे सोपे आहे. यामुळे अनेक भुरटे चोर नशापाण्याच्या गरजा भागविण्यासाठी याचे लोखंड चोरून नेत आहेत.

महाराष्ट्रातील अगदीच मोजक्याच किल्ल्यांवर मूळ सागवानी व लोखंडी साज असणारी प्रवेशद्वारे उपलब्ध आहेत, त्यात वसई किल्ल्यातील प्रवेशद्वारांचा समावेश होतो. मात्र सध्या उपलब्ध असलेल्या दोन सागरी दरवाजास दिंडी दरवाजा व मुख्य दर्या दरवाजा अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. त्यात एकूण चार बुलंद लाकडी झडपा आहेत. या दरवाजात सध्या लोखंडी पट्टय़ा, खिळे, कडय़ा, साखळ्या, कुलूप खाचा इत्यादी वैभव आजही पाहता येते. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर किल्ल्यावर सध्या पर्यटकांना व इतर सर्वानाच भटकंती करण्यास प्रवेशबंदी असतानाही पाचूबंदर, किल्ला बंदर येथे जाण्याची कारणे दाखवत गर्दुल्ले, भिकारी, दारुडे किल्ल्यातील उरलेले वैभव लंपास करण्याच्या तयारीस लागलेले आहेत.

अशा प्रकारची कोणतीही माहिती पुरातत्त्व विभागाकडे उपलब्ध नाही. असे काही प्रकार झाल्याचे निदर्शनास आले नाही, तरीसुद्धा पाहणी करून अधिक माहिती दिली जाईल.

– कैलाश शिंदे, संवर्धक साहाय्यक, पुरातत्त्व विभाग वसई

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iron stolen entrance vasai fort ssh
First published on: 06-08-2021 at 01:00 IST