वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेतर्फे वसई पश्चिमेकडील कौल सिटी येथे बांधण्यात आलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानात पाण्याचा निचरा होण्याची सोय नसल्यामुळे पावसाळ्यात या उद्यानाला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना उद्यानाचा वापर करणे कठीण झाले आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी वसई शहरात विविध ठिकाणी महापालिकेकडून उद्याने बांधण्यात आली आहेत. या उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी घसरगुंडी, झोपाळे, सीसॉ आणि व्यायामाचे सामान बसवण्यात आले आहे. पण गेल्या काही काळात देखभाली अभावी या उद्यानांमध्ये लोकांना वावरणे कठीण होऊन बसले आहे. वसई पश्चिमेकडील कौल सिटी येथे महापालिकेचे उद्यान आहे. शहरात पाच दिवस कोसळलेल्या पावसामुळे या उद्यानात पावसाचे पाणी तसेच साचून आहे. पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी नाला किंवा गटार बांधण्यात आले नसल्यामुळे उद्यानाला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या उद्यानाचा वापर लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात करतात. पण, ज्या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळणी आणि व्यायाम साहित्य बसवले आहे, त्या ठिकाणी केवळ मातीचा भराव टाकलेला आहे. यावर छप्पर नसल्यामुळे पावसाचे पाणी थेट साचून उद्यानात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच या चिखलामुळे उद्यानात नागरिक आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक घसरून पडण्याची शक्यता वाढली आहे. तसेच उद्यानातील खेळणी आणि व्यायाम साहित्य उघड्यावर असल्यामुळे पावसाच्या पाण्याने त्यांचेही नुकसान होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

याबाबत महापालिकेकडे अनेकदा तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिकेच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या उद्यानाची पाहणी करून त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्या जातील असे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात आले आहे.