महाराष्ट्रातील पहिली शाळा, २६ किन्नर शिक्षणाच्या प्रवाहात

विरार :   किन्नर वर्गाला सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी एका महिलेने पुढाकार घेऊन वसईत किन्नर विद्यालयाची स्थापना केली आहे. सध्या या विद्यालयात २६ हून अधिक किन्नर शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रातील ही पहिली शाळा आहे.

वसईच्या पूर्व राजावली परिसरात महाराष्ट्रातील पहिली किन्नरांची शाळा सुरू झाली आहे. महाशक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या मध्यातून ही शाळा सुरु झाली आहे.  रेखा त्रिपाठी या ३६ वर्षीय महिलेने पुढाकार घेऊन हे विद्यालय सुरू केले आहे. यात सध्या २६ हून अधिक विध्यार्थी शिकत आहेत. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांंना शिक्षणाचे धडे देणारा शिक्षकसुद्धा किन्नर असून त्याने आपले १२ पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. पारस ठाकूर असे या शिक्षकाचे नाव आहे. पारसने सांगितले की त्याला हवाई सुंदरी बनायचे होते. पण त्यात किन्नरांसाठी राखीव अशी कोणतेही सुविधा नसल्याने त्याचे स्वप्न अधुरे राहिले. पारस याने १० वीत ७४ टक्के तर १२ वी मध्ये ७८ टक्के गुण मिळविले आहेत. पण सामाजिक बंधनामुळे त्याला आपले शिक्षण सोडावे लागले आहे. पारस सध्या एका नृत्यकला केंद्रात शिक्षक म्हणून काम करत आहे आणि मिळालेल्या वेळेत विद्यार्थ्यांंना शिकवतो. किन्नरसुद्धा समाजाचा घटक आहेत.  त्यांना समाजाने आत्मसात करून घेतले पाहिजे आणि यासाठी शिक्षण हे मोठे शस्त्र ठरू शकते. रेखा त्रिपाटी या गायिका असून त्याच्या व्यावसायातून  या विद्यालयाचा खर्च भागवत आहेत. सरकारने किन्नरांना मतदानाचा अधिकार दिला आहे. मात्र, त्यांच्या विकासाचे प्रश्न आजही अधांतरी आहेत. सामान्य शाळांमध्ये या मुलाच्या बाबतीत अनेक अडचणी येतात. यामुळे इच्छा असूनही त्यांना शिकता येत नाही. म्हणून केवळ या गटासाठी स्वतंत्र शाळा असणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

शाळेच्या विश्वस्त रेखा त्रिपाठी यांनी माहिती दिली की, सध्या खासगी स्तरावर ही शाळा सुरू आहे. शासनाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव टाकण्यात आला आहे. त्याचबरोबर  जी गरीब आहेत व अनाथ आहेत अशा मुलांनासुद्धा विनामूल्य शिक्षण देण्याचा त्यांचा मानस आहे.