गुरुवारी महापालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या परीवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या लोकदरबारात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी तक्रारी मांडल्या. या तक्रारींचे निवारण करण्यात यावे अशा सूचना परिवहन मंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. येत्या आठवडाभरात निर्णय न झाल्यास थेट अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना व्हाव्या यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महापालिकेत लोकदरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यात महापालिका अधिकारी, परिवहन, महसूल, एसटी महामंडळ, पोलीस विभाग, भूमीअभिलेख यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या घेण्यात आलेल्या लोकदरबारात साडेतीनशेहून अधिक नागरिकांनी तक्रार अर्ज दाखल केले होते. या अर्जावर
उत्तर देताना मूलभूत समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना लोकदरबारात यावे लागू नये याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. यासह वसई तालुक्यातील २९ गावे नियमबाह्यरीत्या पालिका क्षेत्रात सामाविष्ट करण्यात आल्याची तक्रार गाव बचाव समितीने मांडली. या तक्रारी बाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
यासह जिल्हा परिषद शाळांमधील शौचालय, अर्नाळा – विरार – खानिवडे एस टी सेवा, घरपट्टीसाठी अतिरिक्त शुल्क आकारणी, बस प्रदूषण, शिधापत्रिकांचा प्रश्न, पुनर्विकासात अडचणी, कालबाह्य कचरा गाड्या, रिक्षाचालकांनी दादागिरी, शहरातील अमली पदार्थांची समस्या, नळजोडणी , कामण – भिवंडी रस्त्याची समस्या, उद्यानांची दुरवस्था, आदिवासी जागांवरील अतिक्रमण असे विविध प्रश्न नागरिकांतर्फे या लोकदरबारात मांडण्यात आले. यावर योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
यात सर्वाधिक तक्रारी या अनधिकृत बांधकामे आणि धोकादायक इमारती याबाबत होत्या. या सर्व तक्रारदारांच्या अर्जाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना यावर कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच शहरात अनधिकृत बांधकामे होऊ देऊ नका, शहर स्वच्छतेला प्राधान्य देऊन शहराचा विकास साधा अशा सूचना सरनाईक यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आमदार राजेंद्र गावित, माजी आमदार रवींद्र फाटक, महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, दीपक सावंत यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
सुरुंग लावून डोंगर पोखरण्याचे प्रकार
विरारच्या कण्हेर डोंगर परिसरात सुरुंग लावून डोंगर पोखरण्याचे प्रकार घडत असल्याची चित्रफीत एका तक्रारदाराने लोकदरबारात दाखवली. सदरचा प्रकार गंभीर असल्याचे सांगत तहसिलदार आणि पोलिसांना तात्काळ कारवाईसाठी घटनास्थळी पाठविले. त्या ठिकाणी असलेले आक्षेपार्ह साहित्य जप्त करून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश यावेळी दिले.
शेतकऱ्यांना नळजोडणी न दिल्याने संताप
एका तक्रारदार शेतकऱ्याने कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केल्यानंतर महापालिकेकडे त्याने नळजोडणीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र पालिकेने कुक्कुटपालन केंद्र असलयाने नळजोडणी नाकारली होती. याबाबतची तक्रार लोकदरबारात आल्यानंतर सरनाईक यांनी यावर पाणी न दिल्याच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला. पालिका अनधिकृत बांधकामांना पाणी देते आणि शेतकऱ्यांना पाणी जोडणी नाकारते असे नमूद करत तातडीने नळजोडणी देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी पालिका अधिकाऱ्यांना दिले.
ठाकरे गटाचा निषेध
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा लोकदरबार सुरु होण्याआधीच मुख्य प्रवेशद्वारावरच शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. यावेळी पन्नास खोके एकदम ओके, ओम भट स्वाहा अशा घोषणा देण्यात आल्या. जनसुरक्षा कायद्याला विरोध नोंदवत हा कायदा सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी करणारा असल्याने हा कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.