सागरी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

विरार :  वसई-विरारचे सागरीकिनारे दिवसेंदिवस संवेदनशील होत चालले आहेत.मागील महिनाभरात या सगरीकिनाऱ्यावर ८ हून अधिक नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. जीवरक्षक म्हणून पालिकेने नेमलेले कर्मचारी मुळात सफाई कामगार कोठय़ातले असून त्यांना सफाईबरोबर सागरी सुरक्षिततेचा भार आला आहे. यामुळे पालिकेने नेमलेले जीव रक्षक सफाई कर्मचारी म्हणून सगरीकिनाऱ्यावर वावरत आहेत. त्यांना सागरीकिनाऱ्यावर सफाई करावी लागत असल्याने सागरीकिनाऱ्यावर  गस्त घालणे कठीण होत आहे. सागरीकिनाऱ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वसई-विरार परिसराला २१ किमी अधिकचा सागरीकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यांवर पर्यटकांची सतत रेलचेल असते. मागील महिन्यात सागरीकिनाऱ्यावर मृतदेह आढळून आले तर दोन बहिणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यात एकीचा मृतदेह सागरीकिनारी आढळून आला. तर मागच्याच महिन्यात दोन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सागरीकिनाऱ्यावर रेती माफिया सातत्याने उत्खनन करून रेतीची चोरी करत आहेत. अशातच केवळ नऊ जीवरक्षक सागरी सुरक्षिततेचा भार सांभाळत आहेत. त्यातही कळंब, राजोडी आणि नावापूर या ठिकाणी कोणतेही जीवरक्षक नाहीत. कारण हे परिसर ग्रामपंचायत परिसरात येत असल्याने पालिका याकडे कोणतेही लक्ष पुरवत नाही. त्याच बरोबर २०१८ मध्ये यातील एक  जीवरक्षकाचा मृत्यू झाला होता. ३ वर्षे उलटूनही पालिकेने त्याच्या जागी कुणाचीच भारती केली नाही. यामुळे तुटपुंज्या मनुष्यबळाच्या जीवावर पालिका सागरी किनारे सुरक्षित ठेवत असल्याचा दावा करत आहे. सध्या कार्यरत असलेल्या जीवरक्षकांना संपूर्ण सागरीकिनाऱ्याची साफसफाई करावी लागत आहे. त्यात अर्नाळा, भुईगाव आणि वसई या ठिकाणी प्रत्येकी केवळ ३ जीवरक्षक कार्यरत आहेत. त्यांना पर्यटकांवर लक्ष ठेवण्याबरोबर सागरीकिनाऱ्याची साफसफाई करावी लागत आहे. हे सर्व कर्मचारी सफाई ठेक्यातून काम करत आहेत. म्हणजे मुळात सफाई कर्मचारी असले तरी त्यांना पालिका जीवरक्षक संबोधत आहे.

जीवरक्षक पदच नाही

पालिकेच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहिती नुसार पालिकेच्या आस्थापनेत जीवरक्षक असे  कोणतीही पद नाही. यामुळे सफाई कर्मचारी वर्गातून या ठिकाणी जीवरक्षक नेमले आहेत. त्यांना सागरी सुरक्षेबरोबर सागरीकिनाऱ्याची सफाई करण्याचे काम दिले आहे. यामुळे मुळात सफाईच्या कामामुळे या जीवरक्षकांना सागरीकिनाऱ्यावर गस्त घालणे शक्य होत नाही. तरीसुद्धा हे कर्मचारी आपले काम करत आहेत.