वसई विरार शहरात पावला पावलावर धोका निर्माण झाला आहे. कधी कोणती घटना घडेल सांगता येत नाही अशीच काहीशी स्थिती शहरात दिसून येत आहे. पालिकेने शहरातील सांडपाणी निचरा होण्यासाठी गटारे तयार केली आहेत. मात्र आता हीच गटारे धोकायदायक ठरत आहेत. काही ठिकाणी गटारांवरील झाकणे धोकादायक स्थितीत आहेत तर काही ठिकाणी गटारांवर झाकणेच नसल्याचे चित्र आहे. याशिवाय त्यावर टाकण्यात आलेले स्लॅब सुद्धा कमकुवत असल्याने अपघाताच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शहरातील गटारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वसई विरार महापालिकेने सांडपाण्याचा निचरा व्हावा यासाठी गृहसंकुले, रस्त्याच्या कडेला, बैठ्या घरांच्या परिसरात गटारे बांधली केली आहेत. मात्र या गटारांची योग्य ती देखभाल करण्यात पालिका अपयशी ठरली आहे. केवळ वसई विरार शहरात गटारांचा विस्तार वाढत आहे. विविध ठिकाणच्या भागात पालिका गटारे तयार करण्याचे काम पूर्ण करीत आहे. सध्या स्थितीत शहरात २२५ किलोमीटर पर्यंत गटारांचा विस्तार झाला असून त्यावर सुमारे १ लाखाहून अधिक झाकणे बसविण्यात आली आहेत. परंतु ही झाकणे बसविल्यानंतर ती सुस्थितीत आहेत किंवा नाहीत याची वेळोवेळी पाहणी होणे गरजेचे आहे. त्या भागात नेमलेले कर्मचारी व अधिकारी हे सुध्दा तेथे लक्ष देत नाहीत. मात्र तसे होत नसल्याने गटारांची झाकणे ही उघड्या स्थितीत राहत आहेत. तसेच काही ठिकाणी गटारे बांधून झाल्यानंतरही त्या ठिकाणी झाकणे बसविण्यात येत नाहीत अशी अवस्था शहरात पाहावयास मिळत आहे. रात्रीच्या सुमारास या अंधारात ही गटारे दिसून येत नाहीत. त्यामुळे अनावधानाने या गटारात पडून आणखीन एखादी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली जात आहे.
मागील काही वर्षांपासून वसई विरार शहरात विविध ठिकाणी गटारात पडून दुर्घटना होण्याचे प्रकार वाढत आहेत. विशेष पावसाळ्यात शहर जलमय होते अशावेळी रस्ते पाण्याखाली जातात. त्यात गटारांच्या उघड्या झाकणांमुळे अपघात होत असतात. शहरात सांडपाणी वाहून नेण्यासाठी पालिकेने गटारे तयार केली आहेत. काही ठिकाणी या गटारातून दुर्गंधी बाहेर येऊ नये व त्यात कोणी पडू नये यासाठी ती बंदिस्त करण्यासाठी सिमेंट काँक्रिटचे स्लॅब टाकण्यात आले आहेत. परंतु काही ठिकाणी स्लॅबचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने स्लॅब कोसळून पडण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. अनेकदा गटारांवर टाकण्यात आलेली लोखंडी झाकणे चोरून नेण्याच्याही घटना घडतात. दोन आठवड्यांपूर्वी नालासोपाऱ्यात भंगार गोळा करणाऱ्या दोघांनी थेट लोखंडी झाकणे चोरून नेल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित झाले होते.
नुकताच वसई पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशिप येथे गटाराचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या स्लॅबवरच पालिकेने खेळण्याचे उद्यान उभारल्याचा उद्योग केला होता. परवा स्लॅब कोसळून खेळण्याचे साहित्य थेट गटारात पडले. सुदैवाने पाऊस असल्याने लहान मुले येथे खेळत नव्हती अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. तर यापूर्वी तहसिलदार कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या लगत असलेल्या गटारावरील स्लॅब कोसळला होता. त्यामुळे आता लहान मुले आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी गटारांवर बांधण्यात आलेले स्लॅब निकृष्ट कामांमुळे काही वर्षातच धोकादायक स्थितीत आहेत. तर काही ठिकाणी देखभालीचा आणि डागडुजीचा अभाव यामुळे भविष्यात अशा ठिकाणी अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे.
वसईच्या धुमाळनगर येथे फेब्रुवारी २०२३ मध्ये गटारावर असलेला स्लॅब कोसळून साबुद्दीन शेख या टेम्पो चालकाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी वसईत स्लॅब कोसळून काही नागरिक जखमी झाले होते. अशा घटना घडल्यानंतर ही पालिकेकडून गांभीर्याने याकडे लक्ष दिले जात नाही. अजूनही अनेक ठिकाणी गटारावरील स्लॅबवर खाद्य पदार्थांच्या गाड्या लावणे, अभ्यासिका उभारणे असे प्रकार सुरूच आहेत. यामुळे तेथेही अशा दुर्घटनेचा धोका नाकारता येत नाही. अशा घटना रोखण्यासाठी गटारांवर असलेल्या स्लॅबची पाहणी करणे आवश्यक असून जे धोकादायक स्थितीत असतील त्याची तात्काळ दुरुस्ती करायला हवी. मात्र तसे होत नसल्याने वारंवार स्लॅब कोसळणे, गटारात पडून अपघात होणे अशा घटना कायम राहिल्या आहेत.
नागरीकांच्या सुरक्षितेसाठी आणि आरोग्यासाठी उघड्या गटारांवर झाकणे आणि स्लॅब टाकण्यात येतात. मात्र त्यानंतर त्याच्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हेच स्लॅब धोकादायक ठरत आहेत. अनेकदा गटारांवर स्लॅब टाकले की त्यावर थेट बेकायदेशीर प्रकारे अतिक्रमण केले जाते. अशा वेळी पालिकेकडून वेळच्या वेळी कारवाई करण्यात येत नाही. काही ठिकाणी या स्लॅबवर बेयकायदा दुकाने, खाऊ गल्ली सुरु आहेत. तर काही ठिकाणी अशा स्लॅबच्या सुरक्षितेला प्राधान्य देण्यापेक्षा थेट पालिकेनेच अभ्यासिका आणि उद्यान उभारल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचे प्राधान्य बाजूला पडून गटारांवर उभारण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे, ते उपक्रम लोकाभिमुख असले तरीही त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊन त्या उपक्रमांना दुय्यमत्व प्राप्त झाले आहे. यामुळे शहरात पालिकेच्या ढीगभर मालमत्ता असताना विद्यार्थी आणि लहान मुलांसाठीचे उपक्रम गटारांवरच का उभारले जातात असा महत्वाचा प्रश्न ही यानिमित्ताने नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
उघड्या गटारांमुळे शहरात अनेक दुर्घटना घडत आहेत. आपल्याकडे एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्याची सवय आहे. मग त्यानंतर लेखापरीक्षण, मदत, दुरुस्ती यासारख्या गोष्टीकडे तात्पुरता लक्ष केंद्रित केले जाते. परंतु अशा घटना घडू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. सुदैवाने तसे होत नसल्याने वसई विरार शहरातील अनेक समस्या कायम आहेत. या समस्या म्हणण्यापेक्षा खरं तर हे धोकेच आहेत हे धोके जर वेळीच लक्षात घेतले नाही तर येत्या काळात उघड्या गटारांमुळे अनेक दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही
मुक्या जनावरांनाही फटका
शहरातील उघडी गटारे ही नागरिकांच्या जीवावर उठली आहेत. तर दुसरीकडे गायी, म्हशी, श्वान अशा मुक्या जनावरांना ही या उघड्या गटारांचा फटका बसत आहे. अनेकदा गटारात अशी जनावरे पडत असतात. त्यांची अग्निशमन दलाच्या मदतीने सुटका करावी लागते असे चित्र दिसून येत आहे. महिन्याभरापूर्वी बोळींज येथे एक बैल गटारात पडल्याची घटना घडली होती.
गुणवत्ता चाचणीचा अभाव
शहरात अनेक ठिकाणी गटारांच्या स्लॅबवरच फेरीवाल्यांनी अतिक्रमण केली आहेत. काही ठिकाणी खाऊ गल्ली थाटण्यात आल्या आहेत. तर वसईतील घटना पाहता पालिकेनेचे गटारावर उद्यान उभारले होते. गटारांच्या स्लबचा उपयोग जर पूर्वपरवानगीने होणार असेल तर त्याआधी स्लॅबची गुणवत्ता तपासली जाणे गरजेचे आहे. मात्र अनेकदा तसे होत नाही यामुळे अपघातांच्या घटना समोर येतात. तर काही ठिकाणी गटारांच्या स्लबचा वापर बेकायदेशीर पद्धतीने केला जातो अशा वेळी तिथे घडणाऱ्या दुर्घटनांची जबाबदारी नेमकी कुणाची हा ही प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे.