वसई : महाशिवरात्रीचा उत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून वसई- विरारमधील अनेक शिवमंदिरात उत्सवाची लगबग सुरू आहे. भाविकांसाठी पालिकेच्या परिवहन विभागातर्फे विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. बुधवार दुपारपासून ३८ बसच्या ११०० बसेसच्या अकराशे फेऱ्या होणार आहेत.
वसई, विरारमध्ये अनेक लहान-मोठी शिवमंदिरे आहेत. त्यामध्ये तुंगारेश्वर डोंगरावरील शिवमंदिर प्रमुख आहे. याशिवाय ईश्वरपुरी, हाथीमोहल्ला आणि विरार फाटा येथे शिवमंदिरे आहेत. दर्शनासाठी शहरासह विविध ठिकाणांहून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात त्यामुळे मोठय़ा उत्साहात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. दोन वर्षे करोनाच्या संकटामुळे महाशिवरात्री उत्सव साजरा करता आला नव्हता. मात्र या वर्षी उत्साहात महाशिवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन करण्याचे काम शिवमंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात येत आहे. मंदिरावर विद्युत रोषणाई, रंगरंगोटी फुलांची सजावट, भाविक भक्तांची दर्शनाची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियोजन अशी सर्व प्रकारचे नियोजन करण्याचे काम सध्या सुरू आहे.
बससेवा
- नवघर पूर्व ते तुंगारेश्वर २० बस -प्रत्येक ५ मिनिटाला फेरी
- नालासोपारा ते तुंगारेश्वर १० बस -प्रत्येक १० मिनिटाला फेरी
- विरार ते तुंगारेश्वर ५ बस – प्रत्येक २० मिनिटाला फेरी
- शिरसाड फाटा ते तुंगारेश्वर ३ बस – प्रत्येक २० मिनिटाला फेरी