कल्पेश भोईर

वसई-विरार शहरात वीजचोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. चोरटय़ांनीसुद्धा नवनवीन प्रकारच्या शक्कल लढवून वीजचोरी करण्यास सुरुवात केली आहे. वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. मात्र ते प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहेत. अलीकडेच महावितरणने एकाच दिवशी ८४ वीजचोरीच्या घटना उघडकीस आणल्या आहेत. यावरूनच वीजचोरांची व्याप्ती फारच मोठी असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या वीजचोरांना रोखण्याचे मोठे आव्हान महावितरणपुढे आहे.

rod attack on st bus conductor marathi news
बारामतीमध्ये महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता नागपुरात एसटी वाहकावर रॉडने हल्ला…
Florida woman’s pet dog scares off alligator Nail-biting video is viral
“क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर

महावितरणच्या वसई मंडळाकडून वसई-विरारसह वाडा शहरास वीजपुरवठा केला जात आहे. घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, कृषी, नागरी सेवा, पथदिवे, असे सुमारे १० लाखांहून अधिक वीज ग्राहक आहेत. दिवसेंदिवस वीज ग्राहकांची संख्या वाढत आहे. शहरात वर्षांला सुमारे अडीच ते तीन हजार मेगा युनिट इतक्या विजेची मागणी आहे. परंतु, ग्राहकांच्या तुलनेत सुरळीत वीजपुरवठय़ासाठी ती अपुरी आहे. असे असताना शहरात वीजचोरांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस चोरीची वीज वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नायगाव, वसई, नालासोपारा, विरार अशा भागांत अनधिकृत बांधकामे व चाळी उभ्या राहत आहेत, अशा ठिकाणी तारांचा गुंता अधिक असल्याने त्यातून चोरून वीजजोडणी घेतली जाते. याशिवाय मीटरमध्ये फेरफार करून, मुख्य वीजजोडणीच्या सेवा वाहिनीला टॅपिंग करून, विद्युत वाहिनीवर आकडे टाकून, अनधिकृत वीज वापर करणे, असे प्रकार सुरूच असतात. त्यामुळे महावितरणची कोटय़वधी रुपयांची वीजचोरी होत आहे.

हेही वाचा >>> वसई: तानसा खाडीत महिला बुडाली; अग्निशमन दलाकडून शोध सुरू

मागील दीड वर्षांत महावितरणने सुमारे तीन हजार वीजचोरीच्या घटना उघडकीस आणल्या आहेत. महावितरणकडून सातत्याने कारवाया करूनही वीजचोरीचे प्रमाण काही थांबण्याचे नाव घेत नाही. याउलट बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात वीजचोर ही स्मार्ट पद्धतीने वीजचोरी करू लागले आहेत. वीज मीटरचे सील तोडून त्यात उपकरण बसवून रिमोट कंट्रोलद्वारे वीजचोरी केली जात आहे. मागील वर्षी कामण आणि माजिवली येथील कारखान्यात रिमोट कंट्रोलद्वारे सुमारे १० कोटी रुपयांची वीजचोरी झाल्याचे महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणले होते. असे प्रकार रोखण्यासाठी महावितरणने मशीन, अ‍ॅक्यु चेक मशीन, झेरा मशीन यंत्राचा वापर करून मीटर तपासणी सुरू केली आहे. असे असतानाही मीटरमध्ये फेरफार करण्याचे काम सुरूच आहे.

सध्या साधे मीटर असल्याने त्यातून सहजपणे फेरफार करून वीजचोऱ्या केल्या जात आहेत. तर काही मीटर सदोष असल्याने त्यात वीज वापराची नोंदणी योग्य पद्धतीने होत नसल्याने महावितरणला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्याची घोषणा केली होती. या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या वीज वापरावर लक्ष ठेवता येणार आहे. एखाद्या ग्राहकाने वीजचोरीचा प्रयत्न केला तरी त्याची माहिती तातडीने महावितरणला कळू शकणार आहे. त्यामुळे छुप्या मार्गाने होणाऱ्या वीजचोरीला आळा घालण्यास मदत होणार होती. स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणने अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठ कार्यालयास सादर केले आहे. त्याचीसुद्धा अंमलबजावणी आजपर्यंत झाली नसल्याने वीजचोऱ्या थांबणार कशा? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

हेही वाचा >>> विरारमध्ये सोसायटीच्या आवारात दुर्घटना, गाडीच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू

महावितरणकडून धडकेबाज कारवाया तर होत आहेत. कारवाईनंतर खरे तर वीजचोरी होण्याचे प्रकार कमी होणे अपेक्षित होते. परंतु, चोरटय़ांनी नवीन मार्गाचा अवलंब करून विजेचा अनधिकृत वापर सुरूच ठेवला आहे. खरे तर आर्थिक तोटा कमी करण्याच्या दृष्टीने वीजचोऱ्या रोखणे एक प्रकारे मोठे आव्हान आहे. हे आव्हान महावितरणने शिताफीने पेलले तर छुप्या मार्गाने वीजचोऱ्या करणाऱ्यांची मुस्कटदाबी करता येणार आहे.

तसेच जे नियमितपणे वीज देयक भरत आहेत, अशा ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करणे तसेच वीजचोरीमुळे होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल.

वीज चोरांविरोधात कारवाईची तत्परता का नाही?

वीज देयकांच्या थकबाकीमुळे महावितरणला मोठा फटका बसतो. एखाद्या सर्वसामान्य वीज ग्राहकाने अवघ्या एका महिन्याचे वीज देयक थकविले तरी त्याचे वीज मीटर काढून वीजपुरवठा खंडित केला जातो. त्या ग्राहकाला वीज देयक भरल्यानंतरही मीटर बसवून घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात खेटे मारावे लागतात. जसे महावितरण थकीत वीज देयकांच्या संदर्भात अगदी तत्परतेने कारवाईसाठी पुढे सरसावते तशीच तत्परता वीजचोरी पकडण्यासाठी का दाखविली जात नाही.

अनेकदा वीज कर्मचारी यांच्या संगनमताचे वीजचोऱ्या होत असल्याचे आरोप होतात. त्यामुळे वीजचोऱ्या करणारे मोकाटच राहतात. याशिवाय बाह्यपद्धतीने (कटआउटद्वारे) चोरीची वीज जोडणी घेतात, त्यांचाही शोध महावितरणने घ्यायला हवा तरच वीजचोरीला आळा बसण्यास मदत होणार आहे.

वीज यंत्रणेवर भार

वीज ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे विजेची मागणी वाढली आहे. यामुळे वीजपुरवठा करणारी उपकेंद्रे, रोहित्र व इतर विद्युत यंत्रणेवर क्षमतेपेक्षा अधिक भार येऊ लागला आहे. अशा स्थितीत वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. असे असताना दुसरीकडे आधीच अतिभार असलेल्या यंत्रणेवर वीजचोरांमुळेसुद्धा भार पडत आहे. त्यामुळे अशा वीजचोरटय़ांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.